पहूर ता. जामनेर, प्रतिनिधी | येथून जवळच असलेल्या हिवरी शिवारातील पाच शेतकऱ्यांच्या शेतातील बोअरवेलमधील तांब्याची तार असलेली केबल वायर अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना मंगळवार (दि. २२) रोजी घडली. चार महिन्यात तिसऱ्यांदा शेतातील केबल चोरीची घटना घडली असून पहूर पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, येथून जवळच असलेल्या हिवरी शिवारातील सुरेश पुंडलिक चौधरी, रामचंद्र पुंडलिक चौधरी, श्यामराव बाळणू पाटील, भावराव किसन घोलप, व पंढरी ओंकार पाटील यांच्या शेतातील तब्बल ४००ते५०० फूट खोल असलेल्या बोअरवेल मधून तांब्याची तार असलेली केबल वायर अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना घडली आहे. गेल्या चार महिन्यात वरिल शेतातील बोअरवेल मधून तांब्याची तार असलेली केबल वायर अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली तर भावराव किसन घोलप या शेतकऱ्याच्या शेतातील बोअरवेल मधील पाईपाचे तुकडे करून बोअरवेल मधून तब्बल तीन वेळेस तांब्याची तार असलेली केबल वायर अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना घडली आहे. तसेच त्यांनी प्रत्येक वेळेस पहूर पोलीस स्टेशनला जावुन तक्रार अर्ज दिलेला आहे. आज पंढरी ओंकार पाटील यांनी पहूर पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल केला आहे. सदर अर्जात नमूद करण्यात आले आहे की, प्रत्येकी २५ हजार रुपयांचे नुकसान झाले असून वारंवार होणाऱ्या या केबल चोरी करणाऱ्या अज्ञात चोरट्यांचा तपास पहूर पोलीसांनी लावावा. व सततच्या त्रासामुळे शेतकरी वर्ग आधीच संकटात असून अश्या सतत होणाऱ्या चोऱ्यांमुळे अडचणीत आले आहे. पोलीस प्रशासनाने या बाबतीत जातीने लक्ष घालून चोरीचा तपास त्वरित करून चोरट्यांना मुद्देमालासह पकडून त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.