भरदिवसा तलाठ्याचे बंद घर फोडून ५ तोळे सोनेसह ५० हजारांची चोरी

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील शिरसोली येथे राहणाऱ्या व कानळदा येथे तलाठी असणाऱ्या व्यक्तीच्या घरात अज्ञात चोरटयांनी भरदिवसा चोरी केल्याची धक्कादायक घटना बुधवारी २२ मे रोजी दुपारी २ वाजता उघड झाली आहे. याप्रकरणी सायंकाळी ५ वाजता एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

आकाश विजय काळे (वय २८, रा. अशोक नगर, शिरसोली प्र. न. ता. जळगाव) यांनी फिर्याद दिली आहे. आकाश काळे हे आईसह शिरसोली येथे राहतात. त्यांची आई सध्या देवदर्शनासाठी उत्तर भारतात गेलेल्या आहेत. तर आकाश काळे हे कानळदा येथे तलाठी आहे. बुधावरी २२ मे रोजी सकाळी ७ वाजेच्या सुमारास त्यांनी ड्युटीवर जाण्यासाठी घर बंद करून शिरसोलीतुन कानळदा येथे गेले. त्यानंतर दुपारी २ वाजता त्यांचा मेसचा डबा देण्यासाठी महिला त्यांच्या घरी गेली, तेव्हा घर उघडे दिसले.

सदर महिलेने आकाश काळे यांना फोन करून घर उघडे असल्याबाबत माहिती दिली. त्यामुळे आकाश काळे हे तत्काळ शिरसोली येथे आले असता त्यांना घरात कपाट उघडे दिसले. कडी कोयंडा तोडलेला दिसून आले. तेव्हा घरात चोरी झाल्याचे त्यांना लक्षात आले. शिरसोलीचे कोतवाल मयूर मराठे, पोलीस पाटील श्रीकृष्ण बारी यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनतर पोलिसांना माहिती दिली.

आकाश काळे यांच्या घरातून ५ तोळे सोने व ५० हजार रुपयांची रोकड लांबविल्याचे दिसून आले आहे. जळगावहून श्वानपथक, ठसे तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले होते. घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित, एमआयडीसीचे निरीक्षक बबन आव्हाड, पोहेकॉ जितेंद्र राठोड आदींनी भेट दिली. दरम्यान, दुपारी १ वाजेच्या सुमारास तोंडाला रुमाल बांधलेल्या एकाला शेजारील महिलेने पाहिल्याची माहिती मिळाली. तर २ जण घरात असावे असा अंदाज व्यक्त केला जात आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

Protected Content