जळगाव लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | जळगाव शहरातील गोलाणी मार्केटमध्ये मध्यरात्री चोरट्यांनी एका मोबाईलच्या दुकानातून रिपेअरिंगसाठी आलेले ५० हजार १०० रुपयांचे पाच मोबाईल चोरून नेले. यानंतर चोरट्यांनी याच मार्केटमधील कुशल इंटरप्राईजेस आणि रियल मी सर्व्हिस सेंटर ही दुकाने फोडण्याचा प्रयत्न केला. ही घटना सोमवारी पहाटे उघडकीस आली. या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधिक माहिती अशी की, मनुमाता नगरात राहणारे अजयसिंग नागेंद्र राजपूत (वय ३९) यांचे गोलाणी मार्केटमध्ये ‘पुजा मोबाईल’ नावाचे दुकान आहे. रविवार १० मे रोजी रात्री ते दुकान बंद करून घरी गेले होते. सोमवार पहाटे ललित गोरखा नावाच्या व्यक्तीने त्यांना फोन करून दुकानाचे कुलूप तोडल्याची माहिती दिली. राजपूत यांनी तातडीने दुकानावर जाऊन पाहणी केली असता, चोरट्याने त्यांच्या दुकानातून दुरुस्तीसाठी आलेले पाच मोबाईल आणि १०० रुपये चोरून नेल्याचे दिसून आले.
चोरट्याने दुकानात चोरी करण्यापूर्वी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तोडफोड केली, तसेच वायफाय कनेक्शनचेही नुकसान केले. पोलिसांनी घटनास्थळाला भेट देऊन तपास सुरू केला आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरट्यांचा शोध घेतला जात आहे.