तक्रार द्यायला आलेल्या तरूणीकडे पोलिसानेच केली शरीरसुखाची मागणी

भंडारा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | पोलिसांच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारा संतापजनक प्रकार भंडाऱ्यामध्ये घडला आहे. पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवायला गेलेल्या तरुणीकडे पोलिसानंच शरीर सुखाची मागणी केल्याचे धक्कादायक वृत्त समोर आले आहे. भंडाऱ्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. अशोक बागुल यांनी शरीर सुखाची मागणी केल्याचा गंभीर आरोप एका तरुणीने केला आहे. या घटनेमुळे पोलीस प्रशासनामध्ये खळबळ उडाली आहे. पीडित तरुणीच्या तक्रारीवरून अशोक बागुल यांच्या विरोधात भंडारा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे.

पीडित तरुणी उच्च शिक्षित आहे. शिक्षण घेत असताना तिचे एका तरुणासोबत प्रेमसंबंध जुळले होते. सात वर्षे ते दोघे नातेसंबंधात होते, यादरम्यान तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून तरुणाने तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले. पण लग्नाचा विषय काढल्यानंतर तो सातत्याने उडवाउडवीचे उत्तर देत होता. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच न्याय मिळवण्यासाठी तरुणी 1 जून रोजी उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ अशोक बागुल यांच्या कार्यालयात धाव घेतली. पण यावेळेस जे काही घडले ते अतिशय चीड आणणारे होते.

यावेळेस बागुल यांनी तिला केबिनमध्ये बसवले आणि “तू सुंदर आहे. आत्महत्या करू नकोस. मी तुझ्यासोबत आहे. मी तुला मदत करतो. पण माझी एक अट आहे. तू आणि मी जवळचे मित्र होऊ. तुझे आयुष्य बदलेन. तू सुशिक्षित आणि सुंदर आहे. मी अजूनही तरुण आहे. आपण डेटवर जाऊ. तू मला त्यासाठी मदत कर. मी तुला कधीच एकटे सोडणार नाही. माझ्या वयावर जावू नकोस. मी तुला आयुष्यभर सांभाळेन. हे तू कोणाला सांगू नकोस”, असे म्हणज बागुल यांनी शरीर सुखाची मागणी केल्याचा आरोप पीडित तरुणीने केला आहे. भंडाऱ्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. अशोक बागुल परिस्थितीचा गैरफायदा घेत असल्याचं जाणवल्याने पीडितेने त्यांच्या विरोधात तक्रार दाखल केली. पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

Protected Content