जलवाहिनीचे कार्य दोन महिन्यात पूर्ण होणार- ना. गुलाबराव पाटील

जळगाव, लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी –  निवडणुकीत दिलेल्या आश्‍वासनानुसार आणि परिसरातील रहिवासी महिलांच्या मागणीनुसार घरोघरी पाण्याचा लाभ मिळण्यासाठी १८.५ कि.मी. जलवाहिनीचे कार्य येत्या दोन महिन्यात पूर्ण होणार असल्याची ग्वाही आज पालकमंत्री. ना. गुलाबराव पाटील यांनी दिली.

वाघनगर पाणीपुरवठा योजनेद्वारा रेट्रोफिटींग अंतर्गत सुरु असलेल्या जलवाहिन्यांच्या कामाचे भूमीपुजन पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी ना. पाटील बोलत होते.

ते म्हणाले कि, निवडणुकीत दिलेल्या आश्वासन व त्याचा पाठपुरावा केल्याने वाघ नगरातील रहिवाशांसाठी जलजीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजना कार्यान्वीत केली असून यातून १ वर्षापासून शुध्द पाण्याचा पुरवठा होत आहे. या जलवाहिन्यांमुळे वाघनगरातील प्रत्येक नागरिकाला वाघूरचे शुध्द पाणी मिळणार असून परिसराच्या विकासकामांसाठी येथील नागरिकांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे.
वाघनगर परिसर जळगाव शहराला लागून असला तरी जळगाव ग्रामीण मतदारसंघात याचा समावेश आहे. या परिसरात सुमारे ३० हजार नागरिकांचा रहिवास असूनही महापालिकेतर्फे पाणीपुरवठा यंत्रणा नसल्याने नेहमीच पाणीटंचाई होती. या परिसरातील नागरिक पाण्यासाठी विहिर, कुपनलीका, टँकरवर अवलंबून असल्याची समस्या लक्षात घेता, जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी सहकार राज्यमंत्री असतांना २७ फेब्रुवारी २०१७ रोजी वाघूर धरणावरून जलजीवन मिशन अंतर्गत थेट पाणीपुरवठा योजनेस प्रशासकीय मान्यता दिली होती. यानंतर वाघनगरसाठी ऑक्टोबर २०१० मध्ये वाघूर धरणातील पाणी आरक्षणाला देत या कामाला गती आली. या योजनेसाठी मार्च २०१८ रोजी वर्कऑर्डर तर, एप्रिल २०२१ योजना प्रत्यक्षात कार्यान्वित झाली आहे. या योजनेच्या माध्यमातून वाघनगर परिसरातील नागरिकांना वाघूर धरणातील पाणी उपलब्ध झाले आहे.

असे असले तरी पुरेशा जलवाहिनीच्या अभावी आणि महिलांच्या मागणीनुसार ना. गुलाबराव पाटील यांनी रेट्रोफिटींगच्या अंतर्गत वाघनगर पाणी पुरवठा योजनेसाठी १८.५ किलोमीटर लांबीच्या पाईपलाईनच्या कामांना मान्यता देण्यात आली. १ कोटी ९० लाख रूपयांच्या कार्यादेश ठेकेदार दुर्गादास पवार यांना एप्रिलमध्येच देण्यात आला असून आज या कामाचे भूमिपुजन पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

वाघनगरातील नागरिकांना दिलेल्या वचनाची पूर्तता ही या योजनेच्या माध्यमातून आधीच करण्यात आली असून आता पाईपलाईनच्या जाळ्यांच्या मदतीने या भागातील लोकांना वाघूरचे शुध्द पाणी मिळणार असल्याचा आपला मनस्वी आनंद आहे. वाघनगर आणि परिसरात झपाट्याने लोकसंख्या वाढीस लागली असून येथील नागरिकांनी सर्व पायाभूत सुविधा मिळाव्यात यासाठी आपण सातत्याने प्रयत्नशील आहोत. पाणी पुरवठा योजना हा यातील महत्वाचा टप्पा आहे. आजपासून सुरू करण्यात आलेले पाईपलाईनचे काम दोन महिन्यात पूर्ण होणार असून या माध्यमातून परिसरातील प्रत्येक घरापर्यंत पिण्याचे शुध्द पाणी पोहचणार आहे. दरम्यान, यासोबत या भागातील स्मशानभूमिसह सुशोभीकरणाचे काम आणि डांबरीकरणाचे काम देखील लवकरच मार्गी लावण्यात येणार
ना. गुलाबराव पाटील. पालकमंत्री,

यावेळी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे मुख्य अभियंता एस.सी. निकम, नगरसेवक संतोष पाटील, सरपंच भगवान पाटील, दिलीप पाटील, उपविभागीय अधिकारी अ.म.चव्हाण, सहायक अभियंता एम.डी.चौधरी, शाखा अभियंता के.एस. चौधरी, राज राठोड, कंत्राटदार दुर्गादास पवार, ग्रामपंचायत सदस्य दीपक पाटील, रवींद्र राव, किशोर बोरसे, आनंद पाटील, समाधान पाटील, जितू करोसिया, चेतन तायडे, भूषण पाटील, बापु बगलाणे, गणेश भोईटे, भोळे सर, किशोर बोरसे.किरण खैरनार. गणेश ठाकुर,महेन्द्र पाटील, अतुल पाटील, प्रदिप बाविस्कर, दिपक सोनवणे, प्रदिप दारकुन्डे, साईधाम सेवक परीवार वाघ नगर आदी उपस्थित होते. दरम्यान, ना. गुलाबराव पाटील यांच्या प्रयत्नातून वाघनगरवासिय, ग्रामपंचायत, साईधाम सेवा समितीतर्फे पालकमंत्र्यांच्या सत्कार करण्यात आला. यानंतर ना. गुलाबराव पाटील यांच्याहस्ते पाईपलाईनच्या कामाचे विधीवत भूमिपुजन करण्यात आले. मजीप्रचे मुख्य अभियंता निकम यांनी प्रास्ताविकातून माहिती दिली. सूत्रसंचालन प्रा. निलेश मोरे यांनी तर आभार सरपंच भगवान पाटील यांनी मानले.

Protected Content