ओटा परिवारातर्फे गरजूंना मदतीचा हात

चोपडा प्रतिनिधी । सामाजिक कार्यात अग्रेसर असणार्‍या येथील ओटा परिवारातर्फे लॉकडाऊनमध्ये गरजू परिवारासाठी मदत करण्यात येत आहे.

कोरोनाचा कहर आता अनेकांना त्रासदायक ठरू लागला आहे. हातावर पोट असणार्‍या मजूर वर्गाला तर हातातोंडाची गाठभेट करणे देखील दिवसेंदिवस कठीण होऊ लागले आहे. लॉकडाऊनमुळे रोजगार बंद आहे. दिवसा कमवून रात्री खायचं अशी आजही अनेक कुटुंब आपल्या आसपास आहेत. अशावेळी अशा कुटुंब व गरजूंप्रती असलेली आपली जबाबदारी ओळखून अनेक स्वयंसेवी संस्था मदतीचा हात पुढे करत आहे. चोपडा शहरातील गुजराथी गल्लीतील ओटा परिवार हा असाच एक सामाजिक उत्तरदायित्व जपणारा परिवार आहे. अनौपचारिकरीत्या एकत्र आलेले परिसरातील अनेक जण या परिवाराचे सदस्य आहेत. विविध सांस्कृतिक कार्यक्रम वर्षभर उत्साहाने एकत्र येऊन साजरे करणारा परिवार शहरातील अनेक आपत्तीच्या वेळी मदतीसाठी उभा राहिलेला आहे.

कोरोना विषाणूच्या या साथीच्या आजाराच्या पार्श्‍वभूमीवर ओटा परिवारामार्फत शहरातील विविध भागात तसेच शहरालगतच्या भागात वस्ती करून पाल टाकून राहणार्‍या, बांधकामाच्या ठिकाणी वस्ती करणार्‍या मजूर वर्गाची भूक भागवण्यासाठी ओटा परिवार पुढे सरसावला आहे. या परिवारामार्फत लॉकडाऊनच्या काळात सुमारे दीडशे कुटुंबांना आठवडाभर पुरेल इतका किराणा तसेच ४०० जणांना ६०० ग्रॅम वजनाची अन्नाची पाकिटे वेळोवेळी वितरित करण्यात आली आहे. स्वयंपाक करणे अन्नाची पाकिटे तयार करणे आणि ती गरजूंपर्यंत वितरित करणे ही सर्व कार्य करत असताना स्वच्छता, आरोग्य आणि सोशल डीस्टनसिंग या गोष्टींचे कटाक्षाने पालन केले जात आहे. या कामात ओटा परिवारातील महिला, ज्येष्ठ नागरिक, युवावर्ग उत्साहाने सहभागी होत आहे. कुणा एका दानशूर व्यक्तीची मदत घेणे ऐवजी सर्वांनी आपला यात सहभाग नोंदवावा अशी भूमिका ठेवत यथाशक्ति मदत केली जात आहे. ओटा परिवाराच्यावतीने आजतागायत कारगिल चौक, धनवाडी रस्ता, देशमुख नगर, रिद्धी सिद्धी कॉलनी, अरुणोदय कॉलनी, नगरपालिके मागील वस्ती, परीस पार्क, हेमलता नगर या परिसरात असणार्‍या मजूर वर्गाच्या वस्त्यांमध्ये अन्न वाटप करण्यात आले आहेत.

Protected Content