बुलडाणा जिल्ह्यात ऊर्जा महोत्सवाचे आयोजन; प्रत्येक घरी वीज पोहचविण्याचे लक्ष

बुलडाणा – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी केंद्र सरकारच्या ऊर्जा मंत्रालय व राज्य सरकार व ऊर्जा विभागाच्या वतीने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत ‘उज्वल भारत उज्वल भविष्य पॉवर @2047’चा ऊर्जा महोत्सवाचा कार्यक्रम बुलढाणा शहरातील जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात संपन्न झाला. 

यावेळी विविध योजनेच्या लाभार्थ्यांना प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले; तसेच पथनाट्यतून महावितरणच्या विविध योजना तसेच ग्राहकांचे अधिकार यांची माहिती देण्यात आली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विधानसभा सदस्य संजय गायकवाड हे होते तर कार्यक्रमाला जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री विसपुते यांची उपस्थिती होती.

देशाने ऊर्जा क्षेत्रात केलेल्या कामगिरीवर प्रकाश टाकण्यासाठी दि. २५ ते ३० जुलै दरम्यान संपूर्ण देशभरात ऊर्जा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. भारत देश ऊर्जेच्या बाबतीत आत्मनिर्भर होण्याकडे वाटचाल करीत असून COP-२१ मध्ये अपारंपारिक ऊर्जा स्त्रोतांद्वारे वीज उत्पादनाचे २०३० पर्यंत एकूण उत्पादन क्षमते पैकी ४०% ऊर्जा निर्माण केली जाईल असे वचनबध्द केले होते; परंतु देशाने हे लक्ष नियोजित वेळेच्या म्हणजेच ९ वर्षाअगोदर गाठले. भारत देश ऊर्जेच्या बाबतीत निर्यात देश ठरला असून मागणीपेक्षा विजेचे उत्पादन हे अधिक असल्याने २०१५ मध्ये सरासरी १२.५ तास वीज उपलब्ध होती ती आज देशात सरासरी २२.५ तास उपलब्ध झालेली आहे.

संजय गायकवाड आपल्या अध्यक्षीय भाषणातून, “वीज ही विकासाची जननी आहे. आम्ही लहानपणी लोडशेडिंग अनुभवली आहे पण आज ती परिस्थिती नाह” हे आपल्या देशाचे ऊर्जा क्षेत्रातील प्रगतीचे पाऊल असल्याचं सांगितलं तर “२०४७ पर्यंत सक्षम भारत घडविण्यासाठी आपल्यासमोर असलेली आव्हाने समर्थपणे पेलण्याची ताकद आपल्याकडे आहे” असं प्रतिपादन जिल्हाधिकारी एस रामामुर्ती यांनी केले. भारत देशाने ऊर्जा क्षेत्रामध्ये केलेल्या कामगिरीवर ७ चित्रफितीच्या माध्यमातून प्रकाश टाकण्यात आला. यावेळी शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेणारे लाभार्थी उपस्थित होते त्यांना प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. विजेमुळे जीवनात त्यांच्या उत्पन्नात कशी भर पडली याबाबतचे समाधान प्रत्येक लाभार्थीच्या मनोदयातून दिसून येत होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक महावितरणचे अधिक्षक अभियंता तथा नोडल अधिकारी संजय आकोडे यांनी केले. तर सूत्रसंचालन विकास बांबल यांनी केले कार्यक्रमाला निवासी उपजिल्हाधिकारी श्री.गीते, उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री लोखंडे तसेच पावर फायनान्स कॉर्पोरेशनचे उपमुख्य व्यवस्थापक तरुणकांत गुप्ता यासह अधिकारी, कर्मचारी व वीज ग्राहक उपस्थित होते.

उपस्थित वीज ग्राहकांसाठी असलेले कायदे, ग्राहकांचे हक्क इत्यादी बाबत महावितरणचे गणेश बंगाळे व त्यांच्या चमूने लघु नाटीकेद्वारे जनजागृती केली तसेच महावितरणच्या विविध योजना लोककला पथकाद्वारे उपस्थितांना सांगण्यात आल्या. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन मनीष कदम यांनी केले.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.