संपाबाबत एसटी कर्मचारी उद्या घेणार निर्णय

मुंबई प्रतिनिधी | परिवहन मंत्री अनिल परब यांनी वेतनवाढीचा तोडगा जाहीर केल्यानंतर यावर पूर्णपणे विचार विनीमय करून आपण उद्या सकाळी निर्णय जाहीर घेणार असल्याची माहिती आ. सदाभाऊ खोत यांनी जाहीर केली आहे. यामुळे संपाबाबत कर्मचार्‍यांची भूमिका ही उद्या सकाळीच स्पष्ट होणार आहे.

याबाबत वृत्त असे की, सध्या सुरू असलेल्या एसटी कर्मचार्‍यांच्या संपावर तोडगा निघावा म्हणून आज गतीमान घडामोडी झाल्या. आज पुन्हा एकदा बैठक झाली. यात विलीनीकरणाच्या ऐवजी पगारवाढ देण्यात यावी असा मुद्दा समोर आला. याबाबत कर्मचारी संघटनांशी पुन्हा बोलण्यात आली. यानंतर या बैठकीत नेमके काय झाले याची माहिती देण्यासाठी अनिल परब यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची भेट घेतली. या दोन्ही मान्यवरांनी वेतन वाढीच्या प्रस्तावाला मान्यता दिली.

यानंतर सह्याद्री अतिथीगृहात परिवहन मंत्री अनिल परब आणि उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आमदार गोपीचंद पडळकर, आमदार सदाभाऊ खोत आणि कर्मचारी संघटनांच्या प्रतिनिधींसोबत चर्चा केली. येथे पगारवाढीच्या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली. यानंतर परिवहन मंत्र्यांनी पत्रकार परिषद घेतली. याप्रसंगी अनिल परब म्हणाले की, एसटी कर्मचार्‍यांना डीए, घरभाडे भत्ते हे राज्य सरकारच्या कर्मचार्‍यांप्रमाणेच देण्यात येत असते. इनक्रीमेंटबाबतचही निर्णय घेण्यात येणार आहे. बेसिक सॅलरीचा प्रश्‍न होता. या अनुषंगाने एक ते दहा वर्षे सेवा असणार्‍या कर्मचार्‍यांच्या मूळ वेतनाच ठोक पाच हजार रूपयांची वाढ करण्यात आलेली आहे. यानंतर १० ते २० वर्षे सेवा असणार्‍या कर्मचार्‍यांच्या मूळ वेतनात चार हजार रूपयांची वाढ करण्यात आलेली आहे. तर, २० वर्षे आणि त्यापेक्षा अधीक सेवा असणार्‍यांच्या मूळ वेतनात अडीच हजार रूपयांची वाढ करण्यात आली असल्याची घोषणा अनिल परब यांनी केली. यामुळे कर्मचार्‍यांनी आपला संप मागे घ्यावा असे आवाहन त्यांनी केले.

दरम्यान, अनिल परब यांच्या घोषणेनंतर आ. गोपीचंद पडळकर आणि आ. सदाभाऊ खोत यांनी आपण या निर्णयाबाबत कर्मचार्‍यांशी आझाद मैदानावर चर्चा करून या संदर्भात घोषणा करणार असल्याची माहिती दिली. या अनुषंगाने आझाद मैदानावरून कर्मचार्‍यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. याप्रसंगी आ. सदाभाऊ खोत म्हणाले की, परिवहन मंत्र्यांनी दिलेला प्रस्ताव आम्ही शांतपणे ऐकून घेतला आहे. या प्रस्तावाबाबत आपण आज रात्रभरात आझाद मैदानावरील आंदोलकांशी सांगोपांग चर्चा करणार आहोत. यानंतर आपण सकाळी पत्रकार परिषदेत संपाबाबत भूमिका जाहीर करणार असल्याची घोषणा सदाभाऊ खोत यांनी केली आहे.

तर, आमदार गोपीचंद पडळकर म्हणाले की, आज रात्रभर आम्ही आझाद मैदानावरच मुक्काम करणार आहोत. आम्ही रात्रभर सर्व आंदोलक कर्मचारी आणि कर्मचारी संघटनांचे प्रतिनिधी यांच्या सोबत चर्चा करू. यात कर्मचार्‍यांशी साधक-बाधक चर्चा करून त्यांनी घेतलेला निर्णय आपण उद्या सकाळी अकरा वाजता पत्रकार परिषदेत जाहीर करू अशी माहिती आ. पडळकर यांनी याप्रसंगी दिली.

Protected Content