शोभायात्रेच्या माध्यमातून घडले दशावतार कथेतील अवतारांच्या सजीव देखाव्याचे दर्शन

फैजपूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरापासून जवळच असलेल्या वढोदे येथील निष्कलंकधाम येथे आयोजित समरसता महाकुंभाच्या शुभारंभप्रसंगी पिंपरूड फाटा ते वढोदे येथील निष्कलंक धामपर्यंत काढण्यात आलेल्या शोभायात्रेच्या माध्यमातून श्री विष्णू परमात्म्याच्या दशावतार कथेतील असलेल्या विविध अवतारांचे सजीव देखाव्याचे दर्शन घडविण्यात आले. तब्बल तीन किलोमीटर ही शोभायात्रा काढण्यात आली.

फैजपुर येथील सतपंथ चॅरिटेबल ट्रस्ट व अखिल भारतीय सनातन सतपंथ परिवार यांच्यातर्फे आयोजित समरसता महाकुंभाचा शुभारंभ दि. 29 डिसेंबर 2022 रोजी झाला. या शुभारंभाच्याप्रसंगी पिंपरूड फाटा येथून भव्य अशी शोभायात्रा काढण्यात आली. या शोभायात्रेत सुरूवातीला कलशधारी बालिका व महिला यांचा समावेश होता. त्यानंतर विविध भजनी मंडळ संतांचे अभंग गात आणि पावली खेळत शोभायात्रेत चालत होते. समरसता महाकुंभासाठी संपूर्ण भारतभरातून आलेले संतमहंत यांची अश्वारूढ रथातून मिरवणूक काढण्यात आली. प्रत्येक रथात चार ते पाच संत उपस्थित होते. अशा पद्धतीने सुमारे 25 रथ एका मागोमाग शोभायात्रेत सहभागी झाले होते. त्याचप्रमाणे महाराष्ट्रीसह गुजरात व भारतभरातील इतर राज्यातून आलेले भाविक शोभायात्रेत हजारोंच्या संख्येने सहभागी झाले होते. शोभायात्रेत सतपंथाचा ध्वज धरण्यात आला होता. या शोभायात्रेत ज्ञानदेवसिंहजी महाराज, ज्ञानेश्वरदासजी महाराज, अविचलदासजी महाराज, स्वामी परमानंदजी महाराज, रामानंदाचार्य रामराजेश्वराचार्यजी महाराज, रवींद्रपुरीजी महाराज, जगद्गुरु शंकराचार्य स्वामी श्री ज्ञानातीर्थजी महाराज, महामंडलेश्वर धर्मदेवजी महाराज यांच्यासह शेकडो संतमहंत सहभागी झाले होते. एवढेच नव्हे तर या धर्माचार्य आणि संत महापुरुषांसह महानुभाव, स्वामीनारायण, वारकरी संप्रदाय यासह विविध संप्रदायातील संत महंत उपस्थित होते. पिंपरूड फाट्यापासून निघालेली ही शोभायात्रा वढोदे येथील निष्कलंक धामपर्यंत आली असता सुमारे दीड किलोमीटरपर्यंत ही शोभायात्रा चालत असल्याचे निदर्शनास आले सुमारे 30 ते 40 भाविक या शोभायात्रेत सहभागी झाले होते. महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या या समरसता महाकुंभाचा शुभारंभ भव्यदिव्य शोभा यात्रेने पार पडला.

दशावतारी कथेतील अवताराचे दर्शन –
शोभायात्रेत विविध सजीव देखावे साकारण्यात आले होते. त्यात भगवान विष्णू यांनी घेतलेल्या दहा अवतारांचे सजीव देखाव्यांचे दर्शन घडवण्यात आले होते. त्याचप्रमाणे यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद आणि ऋग्वेद अशा चार वेदांसह विविध ग्रंथांचे सजीव दर्शन ग्रंथाच्या प्रतिकृती बनवून घडवण्यात आले. भगवान विष्णूच्या सजीव देखाव्यासोबतच या अवतारात जन्म घेतलेल्या इतर देवीदेवतांचे देखील सजीव दर्शन या शोभायात्रेच्या निमित्ताने झाले. श्रीरामाचा सचिव देखावा साकारताना लक्ष्मण, सीता, हनुमान यासह विविध पात्रांचे सजीव देखावे साकारण्यात आले. श्रीकृष्ण, परशुरामाची वेशभूषा धारण केलेले सजीव देखावे शोभायात्रेचे मुख्य आकर्षण होते. या शोभायात्रेत सतपंथ परिवार मोठ्या संख्येने सहभागी झाला होता. त्यामुळे गावोगावच्या महिला मंडळ आणि पुरूष मंडळींनी आपापली वेशभूषा धारण करून शोभायात्रेत सहभागी झाले होते. संत महंतांच्या आणि भाविकांच्या एकत्रीकरणातून निघालेली ही शोभायात्रा लक्षवेधी ठरली या शोभायात्रेनंतर भव्य अशा मंडपात निष्कलंक धामचा लोकार्पण सोहळा पार पडला.

Protected Content