चाळीसगाव येथे पशुवैद्यकीय महाविद्यालयाठी प्रयत्न करणार – ना. बाळासाहेब दोडतले

IMG 20190307 130936

चाळीसगाव(प्रतिनिधी)। चाळीसगाव येथे पशुवैद्यकीय महाविद्यालय सुरु करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे प्रतिपादन पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळाचे अध्यक्ष (राज्यमंत्री दर्जा) ना. बाळासाहेब दोडतले यांनी केले. पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास मंडळ अंतर्गत मेंढी व शेळी विकास प्रक्षेत्र बिलाखेड येथे मेष व लोकर सुधार योजनेंतर्गत मेंढपाळ कार्यशाळेचे आयोजन तसेच राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत शेळ्या-मेंढ्या करिता आधुनिक शेड बांधकामाचे भुमिपुजन ना. बाळासाहेब दोडतले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर आमदार उन्मेश पाटील, पंचायत समितीचे उपसभापती संजय पाटील, सदस्य सुनिल पाटील, महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. महेश बनसोडे, दिनेश बोरसे तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.

यावेळी महामंडळाचे अध्यक्ष ना. बाळासाहेब दोडतले पुढे म्हणाले की, मेंढपाळांना दलालाकडून मिळणाऱ्या मेंढयांमुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी मेंढपाळांना चांगल्या व सक्षम मेंढया बाजारातून घेवून देण्यात येणार आहे. तसेच मेंढयांच्या लोकरीचा व्यवसाय प्रत्येक प्रक्षेत्रात उद्योग म्हणून सुरु करण्यात येणार असून या उद्योगाच्या माध्यमातून ज्या तरुणांना मेंढया पाहिजे त्यांना मेंढया, ज्यांना उद्योग पाहिजे त्यांना लोकरीचा उद्योग देण्यात येईल.

ते पुढे म्हणाले, धनगर समाजाच्या प्रगतीसाठी मुख्यमंत्र्यांनी महामंडळाच्या माध्यमातून एक हजार कोटी रुपये दिले आहे. याचबरोबर रस्त्यावर राहणाऱ्या धनगर कुटुंबांसाठी दहा हजार घरे बांधुन देण्यात येणार आहे. महाराष्ट्र पॅटर्न म्हणून तेलंगना राज्यात राबविण्यात आलेली महामेष योजना संपूर्ण देशात राबविण्यात येणार असून महाराष्ट्रातही ही योजना मोठया प्रमाणात राबविण्यात येणार आहे. महामंडळाला व्यापक रुप देण्यासाठी पुण्य श्लोक अहिल्यादेवी उद्योजकता मेंढी व शेळी विकास महामंडळ असे नामकरण करण्यात येणार आहे. महामंडळाला उद्योजकता नाव मिळाल्यामुळे या माध्यमातून सुशिक्षीत धनगर तरुणांना आवश्यकतेनुसार 10 लाख रुपये कर्ज किंवा अनुदान देणे याप्रकारची योजना राबविता येईल. या योजनेतून मेंढीसाठी लागणाऱ्या पशुखाद्य कारखान्याच्या 10 लाख रुपयांपर्यंतचे युनिट धनगर तरुणांना देता येईल. ऊसतोड कामगारांच्या मुलांच्या शिक्षणासाठी शासनाने शाळा सुरु केल्या आहेत. त्याप्रमाणे मेंढपाळच्या मुलांसाठी शाळा सुरु करण्यासाठी शासनाकडे पाठपुरवा करण्यात येईल असेही त्यांनी सांगितले. यावेळी आमदार उन्मेश पाटील यांनी सांगितले की, तरुणांनी नोकरीच्या मागे न लागता उद्योगातून समुध्दीकडे जावे. समाजाला दोष देण्यापेक्षा आपण स्वत:च्या पायावर उभे राहून शेळी-मेंढी पालनासारखे उद्योग सुरु करावे. हातावर हात धरुन बसण्यापेक्षा आहे त्या परिस्थतीवर मात करुन आपला विकास साध्य करावा. शासन महामंडळाच्या माध्यमातून तरुणांसाठी अनेक योजना राबवित आहे. या योजनांचा लाभ घेवून तरुणांनी आपली प्रगती साध्य करावी.

Add Comment

Protected Content