Home क्राईम वाघूर धरणात पोहण्याचा मोह ठरला जीवघेणा ; युवकाचा बुडून मृत्यू

वाघूर धरणात पोहण्याचा मोह ठरला जीवघेणा ; युवकाचा बुडून मृत्यू

0
7


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । मित्रांसोबत फिरण्यासाठी गेलेल्या भुसावळ येथील २६ वर्षीय युवकाचा कंडारी गावाजवळील वाघूर धरणात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना १३ जून रोजी सायंकाळी घडली. धरणातील पाण्याची खोली न समजल्याने आंघोळीसाठी उतरलेल्या तीन युवकांपैकी एकाचा बुडून मृत्यू झाला असून या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव शहरापासून जवळ असलेल्या वाघूर धरण परिसरात भुसावळ येथील मोहम्मद कैफ, अदनान खान (रा. मटन मार्केट, शिवाजीनगर, भुसावळ) आणि मोहम्मद आवेश अब्दुल गफर (गवळी, वय २६, रा. स्टेशनजवळ, १२ इमाम के पास, गवळीवाडा, भुसावळ) हे तिघे मित्र फिरण्यासाठी आले होते. धरणातील पाणी पाहून त्यांना आंघोळ करण्याचा मोह आवरता आला नाही. त्यानुसार तिघेही पाण्यात उतरले, मात्र पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने ते बुडू लागले. यावेळी मोहम्मद कैफ आणि अदनान खान यांना वाचवण्यात यश आले, मात्र मोहम्मद आवेश अब्दुल गफर यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.

मयत मोहम्मद आवेश हे भुसावळ रेल्वे स्थानकावर खाद्यपदार्थ विक्रीचा व्यवसाय करत असल्याची माहिती त्यांच्या नातेवाईकांनी दिली. घटनेची माहिती मिळताच परिसरात शोककळा पसरली. घटनेनंतर सहाय्यक फौजदार गफूर तडवी, हेड कॉन्स्टेबल मुकुंदा पाटील, हेड कॉन्स्टेबल गजू महाजन, रायपूर येथील पोलीस पाटील रामसिंग परदेशी, वसंता धनगर तसेच तलाठी नंदिनी मेटकर, कोतवाल मंदाताई सोनवणे, तलाठी भावेश रोहिमारे,  कंडारी येथील पोलीस पाटील कैलास सुर्व आणि यांनी स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने युवकाचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू केले.

अनेक तासांच्या शोध मोहिमेनंतर भुसावळ येथील काही युवकांच्या मदतीने सायंकाळी साडेसात ते आठ वाजेच्या सुमारास मोहम्मद आवेश यांचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आला. यावेळी मृताच्या भावाने मृतदेहाची ओळख पटवली. त्यानंतर मृतदेह पुढील कायदेशीर कार्यवाहीसाठी शासकीय रुग्णालय, जळगाव येथे पाठविण्यात आला आहे. या घटनेनंतर प्रशासनाकडून नागरिकांना धरण, नदी आणि जलाशयांमध्ये पोहताना खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.


Protected Content

Play sound