उपमहापौरांवर गोळीबार करणाऱ्या दोघांना पोलीस कोठडी

जळगाव प्रतिनिधी । उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्यावर गोळीबार करणाऱ्या दोन जणांना काल सोमवारी रामानंद नगर पोलीसांनी अटक केली होती. दोघांना आज न्यायालयात हजर केले असता २९ जुलै पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.

उमेश पांडूरंग राजपूत (पाटील) वय-२८ रा. शिंदे नगर, पिंप्राळा जळगाव आणि किरण शरद राजपूत (पाटील)(वय-२४) रा.पांडूरंग नगर, पिंप्राळा जळगाव असे अटक केलेल्या संशयित आरोपींचे नाव आहे. याबाबत वृत्त असे की, रविवारी २५ जुलै रोजी रात्री पावणेदहाच्या सुमारास उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्यावर इनोव्हातून आलेल्या हल्लेखोरांनी गोळीबार करून पळ काढला. यात सुदैवाने त्यांना काही झाले नसले तरी यामुळे प्रचंड खळबळ उडाली आहे. कुलभूषण पाटील यांनी रात्री उशीरा रामानंदनगर पोलीस स्थानकात फिर्याद दिली होती. यानुसार रात्री उशीरा कुलभूषण वीरभान पाटील यांनी रामानंदनगर पोलीस स्थानकात फिर्याद दिली आहे. यानुसार महेंद्र राजपुत; उमेश राजपुत; मंगल राजपुत आणि बिर्‍हाडे ( पुर्ण नाव माहीत नाही) सर्व रा. पिंप्राळा परिसर यांच्या विरूध्द गुन्हे दाखल करण्यात आले होते.

गुन्हा घडल्यापासून पोलिसांनी या चारही संशयितांच्या तपासासाठी चक्रे फिरवली होती. यातील दोन संशयित आरोपी उमेश पांडूरंग राजपूत आणि किरण शरद राजपूत रा. पिंप्राळा जळगाव यांना रामानंद नगर पोलीसांनी काल सोमवारी जामनेर तालुक्यातील मालखेडा येथून अटक केली होती. आज दोघांना न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची म्हणजे २९ जुलै पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. पुढील तपास स.पो.नि. संदीप परदेशी करत आहेत.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!