पिता-पुत्राला मारहाण करणाऱ्या दोघांना सुनावली कारावास व दंडाची शिक्षा

जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील रिधूर येथे पिता पुत्राला किरकोळ कारणावरून मारहाण केल्याप्रकरणी दोन जणांना दोन वर्ष साधा कारावास आणि प्रत्येकी ३ हजारांचा दंडाची शिक्षा मंगळवारी १९ मार्च रोजी दुपारी ३ वाजता जिल्हा न्यायालयाचे न्यायमुर्ती वसीम देशमुख यांनी सुनावली आहे.

विनोद दामू पाटील (वय-३२) व संजय दामू पाटील (वय-२५) दोन्ही रा. रिधूर ता. जळगाव असे शिक्षा झालेल्या दोन्ही आरोपींची नावे आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, ११ डिसेंबर २०१५ रोजी विनोद पाटील व त्याचा भाऊ संजय पाटील या दोघांनी संदीप अशोक पाटील (वय-२५, रा. रिधूर, ता. जळगाव) याला घरी येऊन मारहाण करण्यासह लोखंडी वस्तू मारुन जखमी केले होते. त्यावेळी संदीपला सोडवण्यासाठी गेलेले त्याचे वडील अशोक काशीराम पाटील (वय-५५, रा. रिधूर) यांनाही मारहाण केली होती. तसेच त्यांच्या दुचाकीचे नुकसान केले होते. याप्रकरणी अशोक पाटील यांनी जळगाव तालुका पोलिस ठाण्यात विनोद पाटील आणि संजय पाटील यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या खटल्याच्या कामकाजादरम्यान आठ साक्षीदार तपासण्यात आले. त्यात विनोद पाटील व संजय पाटील या दोघांना २ वर्ष साधा कारावास, प्रत्येकी ३ हजार दंड आणि फिर्यादीस ४ हजार रुपये नुकसान भरपाई देण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी वसीम देशमुख यांनी दिले. सरकार पक्षातर्फे सरकारी वकील स्वाती निकम यांनी प्रभावी युक्तीवाद केला. त्यांना पैरवी अधिकारी विलास पाटील यांनी काम पाहिले.

Protected Content