अपघातात जखमी झालेल्या तरूणाचा मृत्यू

जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी । नातेवाईकाकडे साखरपुड्याच्या कार्यक्रमाहून घरी परतत असताना कानळदा रस्त्यावर आव्हाणे फाट्यानजीक मालवाहू वाहनाने दुचाकीला धडक दिल्यामुळे तरुणजखमी झाला होता. त्याच्यावर उपचार सुरू असतांना सोमवारी मृत्यू घटना घडली आहे. याप्रकरणी धडक देणाऱ्या वाहनचालका विरुद्ध तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जगदीश हिलाल ठाकरे (३८, रा. सुटकार, ता. चोपडा) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. ते शेतीकाम करून परिवाराचा उदरनिर्वाह करीत होते. जगदीश ठाकरे व त्यांचे चुलत भाऊ ज्ञानेश्वर पंडित ठाकरे (वय- ४८, रा. सुटकार, ता. चोपडा) हे धरणगाव तालुक्यातील बांभोरी येथे नातेवाईकांकडे साखरपुड्यासाठी सुटकार येथून दुचाकी क्र. (एमएच १९ बीआर ९०७०) ने रविवारी १७ मार्च रोजी गेले होते. बांभोरी येथून दुचाकीने ते सुटकार येथे परतत असताना आव्हाणे फाट्याजवळ कानळदा रस्त्यावर रात्री ८ वाजता समोरून येणाऱ्या मालवाहू वाहनाने (क्र. एमएच १९, सीवाय ७३३९) दुचाकीला जोरदार धडक दिली.

आजूबाजूच्या नागरिकांनी दोघांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. उपचारदरम्यान प्रकृती खालावल्याने जगदीश याला खाजगी रुग्णालयात सोमवारी १८ मार्च रोजी दाखल करण्यात आले. तेथे उपचार सुरु असताना सकाळी ११ वाजेच्या सुमारास जगदीश ठाकरे यांचा मृत्यू झाला. ज्ञानेश्वर ठाकरे हेदेखील जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरु आहे. दरम्यान जगदीश यांच्या मृत्यूची बातमी कळताच नातेवाईकांनी आक्रोश केला. या प्रकरणी ज्ञानेश्वर ठाकरे यांनी तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून धडक देणाऱ्या वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ अनिल मोरे करीत आहेत.

Protected Content