
जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील महामार्गावरील अपघातांमध्ये आतापर्यंत आठ ते नऊ जणांचा बळी गेल्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट आक्रमक झाला आहे. या अपघातांना जबाबदार असणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, मृतांच्या कुटुंबीयांना २५ लाख रुपयांची नुकसानभरपाई द्यावी आणि त्यांच्या कुटुंबातील एका व्यक्तीला शासकीय नोकरीत सामावून घ्यावे, अशा विविध मागण्यांसाठी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या (NHAI) कार्यालयात ठिय्या आंदोलन केले.

महामार्गावरील अपघातांमुळे निष्पाप नागरिकांना आपला जीव गमवावा लागत असल्याने या घटनांची जबाबदारी निश्चित करून संबंधित ठेकेदारांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी आंदोलकांनी केली. अपघातात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत मिळावी, तसेच त्यांच्या कुटुंबातील एका व्यक्तीला सरकारी नोकरी देण्यात यावी, अशी भूमिका यावेळी मांडण्यात आली. आंदोलनादरम्यान NHAI चे प्रकल्प संचालक भाऊसाहेब साळुंखे कार्यालयात उपस्थित नसल्याने आंदोलकांनी अनोख्या पद्धतीने निषेध नोंदवला. त्यांच्या रिकाम्या खुर्चीला हार घालून आणि शर्ट परिधान करून त्या खुर्चीला निवेदन देण्यात आले. महामार्गावरील अपघातांच्या गंभीर प्रश्नाकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी हा अनोखा मार्ग अवलंबण्यात आला.
प्रकल्प संचालक कार्यालयात येऊन आंदोलकांशी चर्चा करेपर्यंत ठिय्या आंदोलन मागे घेणार नसल्याची ठाम भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली. त्यामुळे काही काळ कार्यालयातील वातावरण तणावपूर्ण झाले. अखेर पदाधिकाऱ्यांनी प्रकल्प संचालक भाऊसाहेब साळुंखे यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून चर्चा केली. त्यानंतर साळुंखे यांनी कार्यालयात येण्याची तयारी दर्शवली. प्रकल्प संचालक कार्यालयात आल्यानंतर आंदोलकांनी त्यांच्याशी चर्चा करून आपल्या मागण्यांचे निवेदन सादर केले. महामार्गावरील अपघात रोखण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अपघातांमध्ये मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना न्याय द्यावा आणि संबंधित ठेकेदारांवर कारवाई करावी, अशा मागण्यांवर यावेळी भर देण्यात आला.



