यावल लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । यावल येथील व्यास शिक्षण मंडळद्वारा संचालित जे. टी. महाजन इंग्लिश स्कूलने माध्यमिक शालांत परीक्षेत उत्कृष्ट कामगिरी केली आहे. नुकताच जाहीर झालेल्या निकालात शाळेतील सर्व २७ विद्यार्थी यशस्वी झाले असून, शाळेने शंभर टक्के निकालाची उज्ज्वल परंपरा कायम राखली आहे.
दहावीच्या परीक्षेत शाळेतील विद्यार्थ्यांनी गुणवत्तापूर्ण प्रदर्शन केले. हिताक्षी विनोद बाविस्कर हिने ९१.८०% गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला, तर मिताली व्यंकटेश बारी ९१.६०% गुणांसह द्वितीय स्थानावर राहिली. खुशबू गणेश धांडे आणि सारा युनूस तडवी या दोघींनी ९१.४०% गुण मिळवत तृतीय क्रमांक विभागून घेतला. देवयानी मनोज करणकर हिने ९०.२०% गुण मिळवून चौथा क्रमांक प्राप्त केला.
शाळेच्या या शानदार यशाबद्दल संस्थेचे चेअरमन शरद जिवराम महाजन, संचालक मंडळ, प्रिन्सिपल रंजना महाजन आणि प्रिन्सिपल दिपाली धांडे यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे. विद्यार्थ्यांच्या कठोर परिश्रमामुळेच हे यश मिळाल्याचे गौरवोद्गार यावेळी काढण्यात आले.