दोघांचे भांडण तिसऱ्याचा लाभ !

bjp jalgaon1

जळगाव (प्रतिनिधी) यात्रेतून घरी आणलेल्या गोडशेवसाठी दोन मोठे भाऊ भांडत असल्यानंतर आई लहान मुलाच्या ताटात अधिकची गोडशेव टाकून मोठ्या मुलांना म्हणते की, हा तुमच्यापेक्षा लहान आहे. तुम्ही दोघं मोठे असून शांतता ठेवत समजुददारपणा दाखवा,असं सांगून आई दोघं भावांचे भांडण शांत करते. अशीच काहीसी चाल भाजपने जळगाव लोकसभा मतदार संघात खेळलीय. त्यामुळे विद्यमान खासदार ए.टी.पाटील आणि भाजप जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांच्या भांडणात तरुण आमदार उन्मेष पाटील यांची उमेदवारीची लॉटरी लागून गेलीय. थोडक्यात दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ झाला असून अधिकची गोडशेव आ.उन्मेष पाटील यांच्या ताटात आलीय.

 

लोकसभा मतदारसंघासाठी भाजपचे आधी जाहीर केलेल्या आमदार स्मिता वाघ यांची उमेदवारी रद्द करून आमदार उन्मेष पाटील यांना तिकिट दिले आहे. भाजपातील अंतर्गत कलहामुळे कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड संभ्रम निर्माण झालेला होता. अगदी लहान-मोठे पदाधिकारी देखील स्मिताताई वाघ यांच्या उमेदवारीला विरोध करीत होते. मुळात हा विरोध स्मिताताई यांच्या ऐवजी त्यांचे पती उदय वाघ यांना होता. खासदार ए.टी.पाटील यांनी देखील मला तिकीट दिले नाही मान्य, परंतु उदय वाघ यांच्या घरात उमेदवारी दिल्यास वरिष्ठांकडे बंडाची भाषा केली होती. तर दुसरीकडे भाजपचे सहयोगी सदस्य आमदार शिरीष चौधरी यांनी देखील उदय वाघ यांना विरोध असल्याचे जाहीर केले होते.

 

घरातूनच होत असलेला विरोध लक्षात घेता भाजपने धक्कातंत्र वापरत चाळीसगावचे आमदार उन्मेष पाटील यांना उमेदवारी घोषित करून टाकलीय.आमदार उन्मेष पाटील विधानसभेची तयारी करीत असतांना त्यांना अचानक बढती मिळत त्यांना लोकसभेची उमेदवारी जाहीर झालीय. राष्ट्रवादीचे उमेदवार गुलाबराव देवकर हे मूळ चाळीसगाव तालुक्यातील असल्यामुळे त्यांना येथून मोठे मताधिक्क्य अपेक्षित होते. परंतु भाजपच्या उमेदवार बदलाच्या निर्णयामुळे जळगाव लोकसभा मतदारसंघात आता राष्ट्रवादीचे गुलाबराव देवकर आणि भाजपचे उन्मेष पाटील यांच्यात कडी टक्कर होणार आहे.

Add Comment

Protected Content