औरंगाबाद वृत्तसंस्था । औरंगाबाद येथील ‘ॲडव्हान्टेज महाराष्ट्र एक्स्पो-२०२०’चे उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. या उद्घाटनाप्रसंगी मुख्यमंत्री म्हणाले की, गॅस पेटवणं सोपं असतं पण गोरगरीबाच्या घरची चूल आधी पेटली पाहिजे, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींना टोला लगावला आहे.
तसेच ते पुढे म्हणाले की, ‘राज्यातील अनेक राजकीय अडचणींवर मात करुन हे सरकार स्थापन झाले आहे. हे शेतकऱ्यांचे सरकार असून मला राज्यातील शेतकऱ्यांना केवळ कर्जमुक्त नव्हे, तर चिंतामुक्त करायचे आहे’. ‘कृषी आणि उद्योग यांचा मिलाफ करुन राज्यात आर्थिक सुबत्ता निर्माण करण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे. मंदी आली म्हणून रडत बसलो तर लढू शकणार नाही. महाराष्ट्राला रडण्याची नव्हे, तर लढण्याची परंपरा आहे’, असे उद्धव यांनी सांगितले. ‘राज्यात अनेक उद्योग येतील, जगाला ‘मेड इन इंडिया’ची भुरळ पडली पाहिजे. असे ही ते यावेळी म्हणाले.