काँग्रेस-राष्ट्रवादीने आमची मतं खाल्ल्याने आमच्या उमेदवारांचा पराभव : आंबेडकर

मुंबई (वृत्तसंस्था) विदर्श, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात वंचितच्या उमेदवारांना घसघशीत मतं मिळाली आहेत. अनेक ठिकाणी आमचे उमेदवार विजयाच्या जवळ पोहोचले होते. मात्र काँग्रेस-राष्ट्रवादीने आमची मतं खाल्ल्याने आमचे उमेदवार पराभूत झाल्याचा आरोप वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.

लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीमुळे काँग्रेस-राष्ट्रवादीचे उमेदवार पडल्याचे उघड चित्र समोर असताना मात्र काँग्रेस-राष्ट्रवादीमुळेच त्यांचे उमेदवार पराभूत झाल्याचा आरोप एका दैनिकाला दिलेल्या विशेष मुलाखतीत प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीला आम्ही लागलो आहोत. भारिप-बहुजन महासंघ, एमआयएम आणि जनता दल मिळून वंचित बहुजन आघाडीच्या बॅनरखाली विधानसभा लढवेल. आम्ही महाराष्ट्रात कमीत कमी ५५ जागांवर विजय मिळवू, असेही ते म्हणाले. राष्ट्रीय राजकारणात काँग्रेस मागे पडली आहे. आगामी काळातही हेच चित्र असेल. पण तरीही काँग्रेस दुसऱ्या पक्षांना पुढे येऊ देत नाही. आम्ही राष्ट्रीय राजकारणात असतो तर भाजपला नाकीनऊ आणले असते, असेही त्यांनी सांगितले.

Add Comment

Protected Content