रायगड-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | अलिबाग तालुक्याजवळ अरबी समुद्रात असलेला बेटावर असलेला खांदेरी किल्ला हा राज्यसरकारने संरक्षित स्मारक म्हणून घोषित केला आहे. राज्याच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाने १९ जून रोजी याबाबतची अधिसूचना जारी केली आहे. त्यामुळे आजवर दुर्लक्षित असलेल्या या सागरी किल्ल्याच्या जतन संवर्धनाच्या अधिकार राज्यसरकारच्या पुरातत्वविभागाला प्राप्त होणार आहेत.
सागरी सुरक्षेच्या दृष्टीने या बेटाचे महत्व ओळखून १६७२ मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी या निर्जन बेटावर तटबंदी उभारण्याचे काम सुरू केले होते. मात्र त्यावेळी झालेल्या विरोधामुळे हे काम अर्धवट सोडून द्यावे लागले होते. मात्र १६७९-८० या कालावधीत महाराजांनी ब्रिटीश, पोर्तुगीज, मुघल आणि सिध्दी यांचा विरोध मोडीत काढून किल्ल्याचे बांधकाम पूर्ण केले होते. छत्रपती संभाजी महाराजांच्या काळात हा किल्ला मराठा साम्राज्याचे प्रमुख नाविक तळ म्हणून उदयास आला. दिर्घकाळ मराठा साम्राज्याचे यावर वर्चस्व राहीले. यानंतरच्या काळात सरखेल कान्होजी राजे आंग्रे कोकण किनारपट्टीवर मराठा आरमाराची बांधणी आणि साम्राज्य विस्ताराला सुरूवात केली. यानंतर कोकणात सागरी वाहतुकीवर त्यांची दस्तक घेण सर्वांना बंधनकरक केले. यामुळे संतापलेल्या ब्रिटीश आणि पोर्तुगिजांनी १२ नोव्हेबर १७१९ मध्ये या किल्ल्यावर एकत्रित हल्ला चढवला. मात्र कान्होजींनी त्यांचा पराभव केला. मुंबई येणाऱ्या जाणाऱ्या जहाजांवर लक्ष ठेवण्याच्या दृष्टीने या किल्ल्याचे महत्व अनन्य साधारण होते. त्यामुळे १८१८ मध्ये ब्रिटीशांनी हा किल्ला ताब्यात घेतला.
जवळपास सहा हेक्टर परिसरात हा किल्ला पसरलेला असून, किल्ल्याची तटबंदी बऱ्यापैकी रुंद आहे. किल्ल्याला २१ बुरूज दोन दरवाजे आहेत. यापैकी महाव्दार नष्ट झाले असून, पश्चिमेकडील चोर दरवाजा शाबूत आहे. किल्ल्यात चार विहीरी आणि जुन्या इमारतींचे अवशेष शिल्लक आहेत. किल्ल्यावर सध्या दिपगृह अस्तित्वात आहे. कोळी समाजाचे देवस्थानही आहे. गेली अनेक वर्ष हा किल्ला दुर्लक्षित अवस्थेत पडून होता. आता मात्र हा किल्ला पुरातत्व विभागाने संरक्षित स्मारक म्हणून घोषित केला आहे. त्यामुळे सागरी किल्ल्याची देखभाल दुरूस्ती करणे शक्य होणार आहे. महाराष्ट्र प्राचीन स्मारके, पुराणवस्तुशास्त्र विषयक स्थळे व अवशेष अधिनियम १९६० अंतर्गत हा किल्ला संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्यात आले आहे.