ब्रेकींग : ‘त्या’ १२ आमदारांच्या नियुक्तीचा मार्ग लवकरच होणार मोकळा

मुंबई प्रतिनिधी | विधानपरिषदेवर राज्यपालांच्या कोट्यातून नामनिर्देशीत होणार्‍या बारा आमदारांचा प्रलंबीत प्रश्‍न मार्गी लागावा म्हणून महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आज राज्यपालांनी भेट घेतली असून यात काही जणांच्या नावांवर राज्यपालांनी आक्षेप घेतल्याची माहिती समोर आली आहे. महाविकास आघाडीने याबाबत माहिती दिली नसली तरी आमदारांच्या नियुक्तीचा मार्ग लवकरच मोकळा होणार असल्याचा आशावाद व्यक्त केला आहे.

याबाबत वृत्त असे की,  विधान परिषदेच्या १२ रिक्त जागांची लवकर नियुक्ती करावी अशी मागणी वारंवार राज्य सरकारकडून करण्यात येत आहे. ६ नोव्हेंबर २०२० रोजी महाविकास आघाडी सरकारनं राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना १२ जणांच्या नावाची यादी पाठवली होती. राज्यपाल नियुक्त जागांबाबत नियुक्तीचा वाद कोर्टापर्यंत गेला. यानंतर

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार हे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेणार होते. मात्र काही कारणास्तव ही भेट झाली नाही. परंतु आज उद्धव ठाकरे, अजित पवार आणि बाळासाहेब थोरात यांनी राज्यपालांची भेट घेतली.

या भेटीचा पूर्ण तपशील समोर आलेला नाही. तथापि, १२ जणांच्या यादीतील आक्षेप घेतलेली नाव वगळण्याची तयारी महाविकास आघाडी सरकारने केली आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी १२ जणांपैकी काही नावांवर आक्षेप घेतला आहे. मात्र बाळासाहेब थोरात आणि अजितदादा पवार यांनी भेट घेतल्यानंतर पत्रकारांशी बोलतांना याबाबतची कोणतीही माहिती दिली नाही. अजित पवार यांनी मात्र बारा आमदारांच्या नियुक्तीचा मार्ग लवकरच मोकळा होणार असल्याचा आशावाद व्यक्त केला.

 

 

Protected Content