हतनूर प्रकल्प पुनर्वसनप्रश्न तातडीने सोडवा- पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांची मागणीस यश

मुंबई, लाईव्ह ट्रेंड्स न्युज वृत्तसेवा – जळगाव जिल्ह्यातील हतनूर प्रकल्पबाधीत ३४ गावांत मुळ अहवालानुसार कामे पुर्ण झाली आहेत. तथापि नव्याने १२ गावांचा पुनर्वसन प्रश्न सोडविण्यासाठी तातडीने सुस्पष्ट प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश मदत व पुनर्वसन मंत्री ना. विजय वडेट्टीवार यांनी दिले.

यावेळी हतनूर प्रकल्प पुनर्वसनासोबतच नव्याने समाविष्ट होणाऱ्या १२ गावांच्या विकासासाठी निधीची पूर्तता करून प्रलंबित असलेली कामे तातडीने पूर्ण करावीत अशी मागणी पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी बैठकीत केली.

जिल्ह्यातील हतनूर प्रकल्पांतर्गत रखडलेल्या पुनर्वसनाच्या प्रश्नाबाबत ना. विजय वडेट्टीवार यांच्या सिंहगड, मंत्रालय, निवासस्थानी पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत घेण्यात आलेल्या बैठकीप्रसंगी दिले. यावेळी ना. वडेट्टीवार म्हणाले कि, हतनूर प्रकल्प पुनर्वसनासाठी शासनाने ३४ गावांसाठी ४० कोटी रूपयांची मान्यता दिली आहे. या ३४ गावात काही नागरी सुविधांची कामे पुर्ण झाली असली तरी काही कामे अपूर्ण आहेत. तसेच ज्या कामांची दरवाढ झालेल्या कामांसाठी लागणारा अतिरिक्त निधी, पुनर्वसनात नव्याने समाविष्ट होणाऱ्या १२ गावांचा सुस्पष्ट प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात यावा. तसेच ही कामे तातडीने पूर्ण करून या पुनर्वसीत गावांचा प्रश्न प्राधान्याने सोडविण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचे सांगितले.

प्रस्तावातील कामांना तातडीने निधी उपलब्ध करून द्यावा-

हतनूर प्रकल्पातील पुनर्वसीत गावांची नागरी सुविधांची प्रलंबित कामे तातडीने मार्गी लावावीत तसेच शासनाकडून या ३४ गावांच्या कामासाठी ४० कोटी रूपयांची तरतूद असली तरी सध्यस्थितीत दरवाढीमुळे या कामांसाठी अधिकचा निधीची आवश्यकता आहे. तसेच हतनूर प्रकल्प पुनर्वसनअंतर्गत नव्याने १२ गावांचाही विकास होणे अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठी आवश्यक असलेल्या कामांना तातडीने निधी देवून ही कामे गतीने पूर्ण करावीत अशी मागणी पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी बैठकीत केली.

यांची होती उपस्थिती

यावेळी पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील, आ.चंद्रकांत पाटील, आ. चिमणराव पाटील, पुनवर्सन विभागाचे उपसचिव धनंजय नायक, नाशिक महसूल उपायुक्त गोरक्ष गाडीलकर, अपर जिल्हाधिकारी तथा पुनर्वसन प्रशासक प्रवीण महाजन, पुनर्वसन उपजिल्हाधिकारी रविंद्र भारदे, कार्यकारी अभियंता आदिती कुलकर्णी आदी उपस्थित होते.

Protected Content