जळगाव लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | गोदावरी फाऊंडेशनच्या गोदावरी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, जळगाव येथे नुकतेच आयक्यूएसी (IQAC) आणि इन्स्टिट्यूशन इनोव्हेशन कौन्सिल (IIC) यांच्या संयुक्त विद्यमाने इनोवेशन आणि स्टार्टअप्स या संकल्पनेवर आधारित एका भव्य प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम ऑडिटोरियममध्ये पार पडलेल्या या प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी आपल्या भन्नाट आणि नाविन्यपूर्ण कल्पना सादर करत 21 व्या शतकातील भारताची संकल्पना मांडली, ज्याने उपस्थितांना थक्क केले.
या राष्ट्रीय स्तरावर मान्यताप्राप्त उपक्रमांतर्गत, विद्यार्थ्यांनी विकसित केलेल्या स्टार्टअप संकल्पनांचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक सादर करण्यात आले. याव्यतिरिक्त, इनोव्हेशन ॲम्बेसेडर्सनी थेट मार्गदर्शन सत्रे घेऊन विद्यार्थ्यांना त्यांच्या कल्पनांना व्यावसायिक रूपात कसे आणता येईल, याबद्दल महत्त्वपूर्ण टिप्स दिल्या.
यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील (प्रेसिडेंट, IIC), डॉ. हेमंत इंगळे (अधिष्ठाता व व्हाईस प्रेसिडेंट IIC), डॉ. अतुल बर्हाटे (समन्वयक, IIC), सर्व विभाग प्रमुख, प्राध्यापक वर्ग आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला डॉ. अतुल बर्हाटे यांनी कार्यक्रमाची भूमिका स्पष्ट केली, तर डॉ. हेमंत इंगळे यांनी विद्यार्थी आणि व्यावसायिक जीवनात स्टार्टअप्स आणि इनोव्हेशनचे महत्त्व अधोरेखित केले आणि नवीन संधींचा पाठपुरावा करण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रेरित केले.
प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील यांनी आपल्या भाषणात, “जगावर राज्य करणारे देश नेहमीच इनोवेशनमध्ये अग्रेसर असतात. म्हणूनच स्टार्टअप्स ही केवळ संकल्पना नसून भविष्याचा आधार आहेत,” असे सांगत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले. या कार्यक्रमाच्या प्रमुख वैशिष्ट्यांमध्ये विद्यार्थ्यांच्या स्टार्टअप्सचे थेट प्रात्यक्षिक, उद्योगाशी थेट संवाद आणि इनोव्हेशन ॲम्बेसेडर्सचे प्रत्यक्ष मार्गदर्शन यांचा समावेश होता.
या यशस्वी आयोजनासाठी प्रा. स्वप्नील महाजन व प्रा. हरीश पाटील यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. रेश्मा अत्तरदे यांनी केले. गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील, डॉ. वर्षा पाटील (सचिव), डॉ. केतकी पाटील (सदस्य), डॉ. वैभव पाटील (डीएम कार्डिओलॉजिस्ट), डॉ. अनिकेत पाटील यांनी ऑनलाईन उपस्थिती लावून विद्यार्थ्यांच्या प्रयत्नांचे कौतुक केले. या प्रदर्शनाने विद्यार्थ्यांमधील सुप्त कलागुणांना वाव दिला आणि त्यांना भविष्यातील उद्योजक बनण्यासाठी प्रेरणा दिली.