जळगाव लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | गोदावरी नर्सिंग कॉलेज येथे नुकतेच ग्रामीण कौशल्यांना प्रोत्साहन देण्यासाठी एका खास हस्तकला कौशल्य सत्राचे आयोजन करण्यात आले होते. या सत्रात विद्यार्थिनींनी मोठ्या उत्साहात सहभाग नोंदवत, पारंपरिक कलेचे महत्त्व अनुभवले.
जामनेर तालुक्यातील मोराड गावातील अरुण आनंदा पाटील यांनी या सत्रात पारंपरिक हस्तकलेतील आपले अनुभव, ज्ञान आणि कला नमुने विद्यार्थ्यांसमोर सादर केले. त्यांनी काचेच्या बाटलीमध्ये शेतीसाठी उपयुक्त नांगर, वखर, तसेच खाट विणकाम, रळी आणि बॉल यांसारख्या वस्तूंचे सजीव प्रात्यक्षिक दाखवले. अनेक विद्यार्थिनींनी प्रथमच ग्रामीण हस्तकलेचे प्रत्यक्ष दर्शन घेतल्याने त्यांच्यात या क्षेत्राविषयी एक नवीन उत्सुकता निर्माण झाली.
या सत्राचा मुख्य उद्देश केवळ वैद्यकीय शिक्षणापुरते मर्यादित न राहता, विद्यार्थिनींना सामाजिक, आर्थिक आणि कौशल्य-आधारित उपक्रमांमध्ये सहभागी करून त्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना देणे हा होता. गोदावरी नर्सिंग कॉलेजने नेहमीच अशा नाविन्यपूर्ण उपक्रमांना प्रोत्साहन दिले आहे.
सत्रानंतर प्रशासकीय अधिकारी श्री. प्रवीण कोल्हे यांच्या हस्ते अरुण पाटील यांना औपचारिक प्रोत्साहन पत्र प्रदान करण्यात आले. यावेळी प्रा. मनोरमा कश्यप, प्रा. पियुष वाघ, इतर प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी आणि मोठ्या संख्येने विद्यार्थिनी उपस्थित होत्या. कौशल्य विकास व विद्यार्थी कल्याण विभागातर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सत्राचा समारोप विद्यार्थिनींनी अरुण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सादर केलेल्या हस्तकलेच्या लघु प्रात्यक्षिकांद्वारे करण्यात आला. या उपक्रमामुळे ग्रामीण कला आणि पारंपरिक कौशल्यांना एक नवी दिशा मिळाली आहे.