चाळीसगाव- लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी हद्दपार केलेल्या एका गंभीर गुन्ह्यातील आरोपींनी आदेशाचा भंग करून बेकायदेशीरपणे चाळीसगाव बस स्थानकाच्या पाठीमागे फिरत असल्याची गुप्त माहिती मिळताच शहर पोलिसांनी सापळा रचून त्याच्या मुसक्या आवळल्या आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, शहरातील लक्ष्मीनगर येथील अक्षय भानुदास पाटील (वय-२५) या तरुणाला उपविभागीय पोलीस अधिकारी यांचे आदेश क्रमांक ०३/२०२० दि. २८ जूलै २०२१ अन्वये त्याच्यावर दाखल गंभीर गुन्ह्यात दोन वर्षासाठी जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आला होता. मात्र सदर इसम २ जानेवारी रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास चाळीसगाव बस स्थानकाच्या पाठीमागील एका पान टपरीच्या आडोशाला फिरत असल्याची गुप्त माहिती शहर पोलिसांना मिळाली. त्यावर पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. तेव्हा आरोपीने पोलिसांशी हुज्जत घातली. तुम्हाला जे करायचा ते करून घ्या. मी पोलीस स्थानकाला येणार नाही. असे सांगून पसार होण्याचा प्रयत्न केला. परंतु अधिक पोलिस बळ बोलावून त्याला ताब्यात घेतले. व पोकॉ दिपक चौधरी यांच्या फिर्यादीवरून चाळीसगाव शहर पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक के. के. पाटील यांच्या निर्देशानुसार पुढील तपास तपास सपोनि दिपक बिरारी करीत आहे.