दिपनगरच्या नवीन 660 मेगावॅट प्रकल्पातील अपघातांची मालिका थांबता थांबेना

दीपनगर- लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । दिपनगर येथील नवीन 660 मे.वॅ.प्रकल्पातील अपघातांची मालिका कायम असून येथे पुन्हा एक अपघात झाला आहे.

दीपनगर येथील नवीन 660 मे.वॅ. प्रकल्पात घडत असलेल्या अपघातांची माहिती वेळोवेळी प्रसारित करून सुद्धा भुसावळ प्रकल्पातील महाजेनकोचे मुख्य अभियंता शशांक चव्हाण आणि भारत हेवी इलेक्ट्रिकल्स कंपनीचे प्रकल्प संचालक डी.जे. जवादे हे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचे निदर्शनास येत आहे.

भारत हेवी इलेक्ट्रिकल्स कंपनी कडून त्यांच्या अधिपत्याखाली काम करत असलेल्या वेगवेगळ्या कंपन्यांतर्गत काम करणाऱ्या कामगारांचे होणाऱ्या अपघातांची माहिती दळपण्याचे षडयंत्र सुरू आहे. नवीन प्रकल्प वीज निर्मितीसाठी सुरू करण्याच्या घाई गर्दी मध्ये बऱ्याच कामगारांना आपला जीव गमवावा लागला आहे तसेच काही कामगारांना अपंगत्व आलेले आहे.

सदर प्रकाराची माहिती प्रकल्पातील उच्च अधिकार्‍यांना तसेच महाजेनकोचे प्रकल्प संचालक अभय हरणे यांना असून सुद्धा त्यांच्याकडूनही दोषींवर कुठलीही कार्यवाही होत नसल्याचे निदर्शनास येत आहे. दिनांक 8 जानेवारी 2025 रोजी भारत हेवी इलेक्ट्रिकल्स कंपनीच्या अखत्यारित काम करत असलेल्या क्लिअर वॉटर लिमिटेड या कंपनीमध्ये इन्चार्ज पदावर कार्यरत अभय भान वय 50 वर्ष याचा पी.टी. प्लांट ठिकाणी असुरक्षित काम करीत असताना अपघात झाला. तसेच त्या कामाच्याठिकाणी कंपनीचा औद्योगिक सुरक्षा अधिकारी सुद्धा नव्हता.

सदर अपघातामध्ये अभय भान यांच्या पायाला खूप जबरदस्त दुखापत झालेली आहे.या अपघाताची कल्पना महाजेनको प्रशासनाला दिली गेली नसून भारत हेवी इलेक्ट्रिकल कंपनी प्रशासनाचे प्रकल्प संचालक डी.जे.जवादे यांच्या आदेशानुसार सदर अपघातग्रस्त अभय भान यांना परस्पर रुग्णवाहिकेचा वापर टाळून खाजगी वाहनाने जळगाव येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. तसेच प्रशासनाकडून कोणताही अपघाताचा अहवाल भरला गेला नाही आणि अपघात झाल्याचे लपविण्यात आले.

भारत हेवी इलेक्ट्रिक कंपनीचे प्रकल्प संचालक डी.जे.जवादे यांच्या हट्टी आणि मनमानी कारभारामुळे प्रकल्पात वारंवार अपघात घडत आहेत. विशेष बाब म्हणजे काल घडलेल्या अपघाताच्या कामा ठिकाणी काम करण्याचे कोणतेही कामाचे परमिट घेतलेले नव्हते. तसेच यापूर्वीही झालेल्या अपघातांमध्ये कोणतेही कामाचे परमिट घेतलेले नसून अपघात झाल्यानंतर कामाचे परमिट बनविण्यात आलेले आहेत.

नवीन प्रकल्पामध्ये भारत हेवी इलेक्ट्रिकल्स कंपनीकडून सर्व कागदोपत्री घोळ सुरू असून महाजेनको प्रशासन सुद्धा कुठली ही ठोस कार्यवाही करत नसल्याचे निदर्शनास येते. एकंदरीत भारत हेवी इलेक्ट्रिकल्स कंपनी आणि महाजेनको प्रशासनाच्या अधिकाऱ्यांच्या आर्थिक चिरीमिरीमुळे कोणत्याही प्रकारची कार्यवाही होत नसल्याची चर्चा सर्व कामगारांमध्ये आहे.नवीन प्रकल्प कार्यान्वित करण्याकरता अजून भविष्यात किती लोकांचा जीव गमवावा लागेल याची कल्पना करता येत नाही. उच्च अधिकाऱ्यांच्या वैयक्तिक आर्थिक स्वार्थापोटी सतत घडत असलेल्या अधिकारी अपघातांकडे अक्षम्य दुर्लक्ष करीत आहे. महाजेनकोचे 660 मे.वॅ. प्रकल्पाचे मुख्य अभियंता शशांक चव्हाण यांच्याशी वेळोवेळी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क साधणे होऊ शकला नाही.

Protected Content