यावल तालुक्यात कोरोनाच्या दोन वर्षानंतर वाजली शाळेची घंटा

शिक्षक व विद्यार्थ्यांचे झाले स्वागत

यावल प्रतिनिधी | सुमारे दोन वर्षानंतर तालुक्यातील इयत्ता पहिली ते सातवीच्या शाळेच्या घंटा वाजल्या असून विविध गावातील सरपंच, शालेय समिती सदस्य व शिक्षकांच्या वतीने विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले.

राज्य शासनाच्या निर्णयाने कोरोना संसर्गाचा प्रार्दुभाव संपुष्टात येत असतांना तसेच लसीकरणाची मोहीम ही जवळपास आटोक्यात येत असुन याच पार्श्वभुमीवर शासनाच्या शिक्षण विभागाने दि.१डिसेंबरपासून शाळा सुरु करण्यास मान्यता दिल्या आहेत त्यामुळे यावल तालुक्यातील इयत्ता पहिली ते सातवीच्या तालुक्यातील १७८ शाळेच्या घंटा सुमारे दोन वर्षानंतर वाजल्या. १७ हजार ९१० विद्यार्थ्यांपैकी ७ हजार ५० विद्यार्थी-विद्यार्थिनींनी शाळेत उत्साहाने उपस्थिती लावली. विविध गावातील सरपंच, शालेय समिती सदस्य व शिक्षकांच्या वतीने विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. कोरोना पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांचे तापमापन, ऑक्सीजन लेव्हलही शाळांमधून चेक करण्यात आली.
तालुक्यात इयत्ता पहिली ते चौथीच्या १३५ तर इयत्ता १ ते ७ च्या ४३ अशा १७८ प्राथमिक शाळा आहेत. या सर्व शाळा सुमारे १९ महिन्यानंतर शासकीय आदेशान्वये बुधवारी सुरू झाल्या. पहिल्याच दिवशी शाळांमधून विद्यार्थ्यांची सुमारे ४० टक्के उपस्थिती राहिली.

तालुक्यातील शिरसाड येथील ग्रामपंचायत सदस्य तेजस पाटील यांनी स्वतःच्या मानधनातून विद्यार्थ्यांसाठी मास्क तर शाळेला थर्मामीटर व ऑक्सिमीटर भेट दिले आहेत. येथील गट शिक्षण अधिकारी नईमुद्दीन शेख, विस्तार अधिकारी व्ही.सी.धनके यांनी यावल तालुक्‍यातील बोरखेडा खुर्द , डोंगर कठोरा, हिंगोणा या शाळांना भेटी दिल्या व शैक्षणिक कामकाजाची पाहणी केली .

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!