
जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांना गेल्या सहा महिन्यांपासून वेतनाअभावी अडचणींना सामोरे जावे लागत होते. सेवार्थ प्रणालीवरील प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या आस्थापनेतील मंजूर पदांची अद्ययावत नोंद उपलब्ध नसल्यामुळे ही समस्या निर्माण झाली होती. अखेर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांच्या हस्तक्षेपामुळे आणि सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे सदर त्रुटी दूर करण्यात यश आले आहे.
या समस्येची दखल घेत मिनल करनवाल यांनी केवळ स्थानिक पातळीवरच नव्हे तर मंत्रालय स्तरावरही वेळोवेळी पाठपुरावा केला. त्यांच्या स्पष्ट सूचना आणि पुढाकारामुळे आरोग्य विभागाच्या प्रशासनाने संबंधित मुंबई कार्यालयाशी नियमित संवाद साधून तांत्रिक त्रुटी दूर करण्यासाठी प्रयत्न केले.
प्रणालीतील अडथळे दूर झाल्याने संबंधित कर्मचाऱ्यांची वेतन प्रक्रिया अखेर सुरळीत झाली असून, त्यांच्या खात्यात लवकरच थकवलेले वेतन जमा होणार आहे. यामुळे अनेक कर्मचाऱ्यांना आर्थिक दिलासा मिळाला असून त्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य फुलले आहे.
या प्रक्रियेस यशस्वी करण्यासाठी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन भायेकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासन अधिकारी व तांत्रिक पथकाने विशेष मेहनत घेतली. सेवार्थ प्रणालीतील अचूक नोंदींसाठी आवश्यक ती माहिती, दस्तऐवज आणि प्रणाली अद्यतनित करण्याचे काम अत्यंत काटेकोरपणे पार पाडण्यात आले.
ही समस्या मार्गी लागल्यामुळे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील प्रशासनिक कामकाज अधिक गतिमान व सुरळीत होण्यास मदत होणार आहे. तांत्रिक व्यवस्थेत सुधारणा झाल्याने भविष्यात अशा अडचणींचा सामना करावा लागू नये, यासाठी पावले उचलण्यात येत असल्याचेही अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.



