धरणगाव तालुक्यातील शिक्षक निलंबित ; सीईओंच्या आदेशानंतर कारवाई


जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी ।  धरणगाव तालुक्यातील कवठळ येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक सुरेश चंद्रा सोनवणे यांना शाळेत मद्यपान करून येणे आणि वारंवार अनुपस्थित राहणे या गंभीर कारणांमुळे अखेर निलंबित करण्यात आले आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांच्या आदेशानंतर ही तातडीची कारवाई करण्यात आली असून, जिल्हा परिषदेच्या गट विकास अधिकारी, पंचायत समिती धरणगाव यांनी १० ऑक्टोबर रोजी अधिकृत निलंबन आदेश जारी केला.

६ ऑक्टोबर रोजी शाळा बंद असल्याचे ग्रामस्थांच्या निदर्शनास आल्यानंतर संतप्त नागरिकांनी गट शिक्षण अधिकारी, धरणगाव यांच्याशी संपर्क साधला. यानंतर केंद्रप्रमुखांनी तातडीने चौकशी सुरू केली. शाळेला कुलूप असून शिक्षक अनुपस्थित असल्याचे स्पष्ट झाले. चौकशी दरम्यान संबंधित शिक्षकास नोटीस पाठवण्यात आली होती, मात्र त्यांनी त्याला प्रतिसाद दिला नाही.

९ ऑक्टोबर रोजी गट शिक्षण अधिकारी आणि केंद्रप्रमुख चांदसर व पाळधी यांनी शाळेला भेट दिली. चौकशीदरम्यान ग्रामस्थ, पालक, शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी आणि सहशिक्षकांनी शिक्षक सोनवणे यांच्याविरोधात गंभीर स्वरूपाच्या तक्रारी नोंदवल्या. यात विशेषतः शाळेत मद्यपान करून येणे, वर्ग न घेणे, विद्यार्थ्यांकडे दुर्लक्ष करणे, तसेच अनेकदा अनधिकृत गैरहजेरी यांचा समावेश होता.

या संपूर्ण प्रकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत, तातडीने कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले. त्यांच्या आदेशांनुसार शिक्षक सुरेश चंद्रा सोनवणे यांना तत्काळ प्रभावाने निलंबित करण्यात आले.

या घटनेमुळे जिल्हा परिषद शिक्षण विभागात खळबळ उडाली असून, शाळांतील शिस्तबद्धता आणि शिक्षकांचे आचारधर्म यावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. ग्रामस्थांनी प्रशासनाच्या त्वरित कारवाईचे स्वागत केले असून, अशा शिक्षकांवर कठोर पावले उचलावीत, अशी मागणी केली आहे.