
जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव महापालिका निवडणुकीच्या तयारीत एक महत्त्वाचा टप्पा पार पडला असून, ९ ऑक्टोबर रोजी प्रशासनाने १९ प्रभागांची अंतिम रचना अधिकृतरीत्या जाहीर केली आहे. प्रारूप प्रभाग रचनेवर आलेल्या ७० हरकतींपैकी केवळ ६ हरकतींचा स्वीकार करण्यात आला असून उर्वरित हरकती फेटाळण्यात आल्या आहेत. यामध्ये प्रामुख्याने प्रभाग क्रमांक ४ आणि ५ मध्ये अंशतः बदल करण्यात आले असून, सर्वाधिक हरकती नोंदवलेला पिंप्राळा गावठाण भाग जसाच्या तसा कायम ठेवण्यात आला आहे.
महानगरपालिका आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांनी महापालिकेच्या सभागृहात अंतिम नकाशासह ही रचना जाहीर केली. सकाळपासूनच अनेक नागरिक, राजकीय पक्षांचे पदाधिकारी आणि इच्छुक उमेदवार या रचना पाहण्यासाठी महापालिकेत गर्दी करत होते. रचना महापालिकेच्या संकेतस्थळावर देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे.
प्रभाग क्रमांक ४ मध्ये गट क्रमांक ६९ वाढवण्याबाबत करण्यात आलेली हरकत मान्य करत, रामदास पाटील स्मृती सेवा ट्रस्ट जळगाव सार्वजनिक शाळा, नेरी नाका खासगी बसस्थानक आणि जोशी पेठ वखार यांचा समावेश प्रभाग ४ मध्ये करण्यात आला आहे. परिणामी, प्रभाग ५ मधून हा भाग कमी करण्यात आला आहे. माजी नगरसेवक कैलास सोनवणे यांच्या हरकतीनंतर हा बदल अमलात आणण्यात आला.
पूर्वी प्रभाग ५ ची हद्द अजिंठा चौकाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या दक्षिण बाजूने लेंडी नाल्यापर्यंत होती. आता ती लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याच्या उत्तरेकडून पुढे जाऊन लेंडी नाल्यापर्यंत वाढवण्यात आली आहे. यामुळे दोन्ही प्रभागांच्या सीमारेषांमध्ये स्पष्ट बदल झाल्याचे चित्र आहे.
या टप्प्यानंतर सर्वांच्या नजरा आता प्रभागांच्या आरक्षणाकडे लागल्या आहेत. २०१८ च्या आरक्षणानुसार निवडणूक होणार असून, ७५ पैकी ५२ जागा आरक्षित असणार आहेत. मात्र, नव्या प्रभाग रचनेनुसार कोणता प्रभाग कुणासाठी राखीव राहील, यावर आगामी राजकीय समीकरणे ठरणार आहेत.
२०१८ च्या निवडणुकीत भाजपने ५७ जागा जिंकत एकहाती सत्ता मिळवली होती. मात्र, नंतरच्या घडामोडींमध्ये पक्षफुटीनंतर सत्ता शिवसेनेकडे गेली. आता शिवसेना देखील विभागली असून, राष्ट्रवादी काँग्रेसचे गुलाबराव देवकर अजित पवार गटाला बळकटी देताना दिसत आहेत. भाजपने महायुतीच्या बॅनरखाली निवडणुका लढवण्याचा इशारा दिला असला तरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्येक ठिकाणी स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊन निर्णय घेण्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळे दोन्ही मित्र पक्षांनी सावध पवित्रा घेतल्याचे दिसून येत आहे.
महानगरपालिका निवडणुकीचा रंग आता चांगलाच तापू लागला आहे. अंतिम प्रभाग रचना जाहीर झाल्यामुळे इच्छुक उमेदवारांचे गणित मांडले जाऊ लागले आहे. आता फक्त आरक्षणाच्या सोडतीची वाट पाहत सर्वच राजकीय गट रणनिती ठरवत आहेत.



