लोकसभा निवडणुकीपूर्वी लागणार ‘त्या’ आमदारांच्या अपात्रतेचा निकाल !

नवी दिल्ली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | शिवसेनेतील फुटीनंतर उध्दव ठाकरे यांनी केलेल्या १६ आमदारांच्या तक्रारीवर आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी निर्णय घ्यावा असे निर्देश आज सुप्रीम कोर्टाने विधानसभाध्यक्ष राहूल नार्वेकर यांना दिले आहेत.

गेल्या वर्षाच्या मध्यावर शिवसेनेत फुट पडून राज्यात सत्तांतर झाले. यात उध्दव ठाकरे यांनी १६ आमदारांना अपात्र करावे या संदर्भात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. यावर कोर्टाने निकाल देण्याचे अधिकार हे विधानसभेचे अध्यक्ष राहूल नार्वेकर यांना प्रदान केले. मात्र अनेक महिने उलटून देखील ते निर्णय घेत नसल्याने ठाकरे गटाने पुन्हा सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. यावर आज कोर्टात सुनावणी झाली.

आज न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांच्या खंडपीठाने राहूल नार्वेकर यांच्या वेळकाढूपणावर चांगलीच नाराजी व्यक्त केली. त्यांनी १७ ऑक्टोबर पर्यंत अपात्रतेचा कालानुक्रम जाहीर करावा.  तसेच आगामी लोकसभा निवडणुकीच्या आधी आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय घ्यावा असे निर्देश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत. यामुळे आता आमदारांच्या अपात्रतेच्या निर्णयावर लवकरच निर्णय होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Protected Content