ममतांनी मोदींना दिले बंगाल भेटीचे निमंत्रण

10inMamata Modimni

नवी दिल्ली, वृत्तसंस्था | तृणमूल काँग्रेसच्या नेत्या आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी मोदींकडे पश्चिम बंगालचे नाव बदलण्याची मागणी केली. तसेच मोदींना नवरात्रीनंतर पश्चिम बंगाल भेटीचे आमंत्रणही दिले. लोकसभा निवडणुकीत भाजप आणि ममता बॅनर्जी यांच्यातील वाद शिगेला पोहोचला होता. या पार्श्वभूमीवर मोदी-बॅनर्जी यांच्या भेटीकडे राजकीय निरीक्षकांचे लक्ष लागले होते.

 

ममता बॅनर्जी यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेऊन त्यांना कुर्ता आणि मिठाई भेट दिली. त्यानंतर त्यांच्याशी चर्चा करत पश्चिम बंगालचे नाव बदलण्याची मागणी केली. पंतप्रधान मोदींनीही पश्चिम बंगालचे नाव बदलण्याचं आश्वासन दिल्याचे ममता यांनी सांगितले. तसेच मोदींकडे राज्यासाठी १३,५०० कोटी रुपयांचा निधी देण्याची मागणी केल्याचंही त्यांनी सांगितले. तसेच एनआरसी आसाम कराराचा भाग होता इतर ठिकाणी त्याची तरतूदच नव्हती, याकडेही मोदींचे लक्ष वेधल्याचेही त्या म्हणाल्या.

मी दिल्लीला नेहमी येते. तेव्हा केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेत असते. यावेळी अर्थमंत्र्यांशी भेट होऊ शकणार नाही. कारण पश्चिम बंगालचे अर्थमंत्री सोबत आलेले नाहीत. मोदींबरोबरची आजची भेट ही राजकीय भेट नव्हती, असे सांगतानाच भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांची भेट घेण्याची इच्छाही त्यांनी व्यक्त केली. शहा यांनी वेळ दिल्यास उद्या त्यांची भेट घेणार असल्याचेही ममता म्हणाल्या. यावेळी त्यांनी मोदींना नवरात्रीनंतर पश्चिम बंगालमध्ये येण्याचे आणि जगातील दुसऱ्या क्रमांकाच्या सर्वात मोठ्या कोल ब्लॉकचे उद्घाटन करण्याचे निमंत्रणही दिले.

Protected Content