वरळीतील नौदलाच्या टेहळणी मनोऱ्याची संरक्षण भिंत कोसळली

मुंबई वृत्तसंस्था । वरळी कोळीवाड्याजवळ असलेल्या नौदलाच्या टेहळणी बुरुजाची १० फुटी संरक्षक भिंत सोमवारी रात्री कोसळली. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नसली तरी भिंतीला लागून असलेल्या १५ दुचाकींचे नुकसान झाले आहे. या धोकादायक भिंतीबाबत पालिका व नौदलाने दुर्लक्ष केल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे.

वरळी कोळीवाडय़ाजवळील गोलफादेवी मंदीराच्या जवळ गेल्या ५० वर्षांपासून नौदलाचा टेहळणी बुरूज आहे. या बुरुजाला लागून २२५ मीटर लांबलचक व १० फूट उंच संरक्षक भिंत असून तिचा काही भाग रात्री ढासळला. या टेहळणी बुरुजाला व संरक्षक भिंतीला अनेक भेगा पडल्या आहेत.

पावसाळ्यात भिंत किंवा बुरूज पडून एखादी दुर्घटना होण्याची शक्यता येथील रहिवाशांनी वर्तवली होती. तसे पत्रही १० जूनला मुख्यमंत्री कार्यालयाला, पालिका आयुक्तांना व नौदलाला पाठवण्यात आले होते. मात्र त्यावर कोणतीही कारवाई झाली नसल्याची माहिती येथील रहिवासी शरद कोळी यांनी दिली.

दुर्घटनेत १० फुटाची भिंत कोसळली तेव्हा कोणतीही जीवितहानी झालेली नसली तरी भविष्यात हा ४० फूट बुरूज कोसळल्यास मात्र खूप अनेकांचे जीव जातील, अशी भीतीही कोळी यांनी वर्तवली आहे.

वरळी कोळीवाडय़ाला लागून असलेल्या समुद्रकिनाऱ्यानजीक जे. के. कपूर चौकाजवळ ‘आयएनएस त्राता’ हा भारतीय नौदलाचा तळ आहे. २२५ मीटर लांब संरक्षक भिंतीच्या आत २० एकर जमिनीवर हा तळ आहे. भिंतीच्या पलीकडे नौदलाची वसाहत आहे. १९४१ साली ही भिंत व मनोरा बांधण्यात आला होता. ३५ फूट उंच असलेला हा टेहळणी बुरूज म्हणजे वरळीची एक ओळखच आहे.

भिंतीच्या पलीकडे दाट झाडी असून मातीच्या भारामुळे ही भिंत कलली होती. ही बाब नौदलाच्या निर्दशनास आणून दिली होती, अशीही प्रतिक्रिया कोळी यांनी दिली. त्यामुळे या बुरुजाची व संरक्षक भिंतीची लवकरात लवकर डागडुजी करावी, अशी मागणी येथील रहिवाशांनी केली आहे.

Protected Content