धरणगाव शहरात गाळ्यांचे भाडे माफ करा ; प्रशांत गांगुर्डे यांची मागणी

धरणगाव, प्रतिनिधी ।  गेल्या तीन महिन्यांपासून लॉकडाऊन सुरु असल्यामुळे काही व्यवसाय सोडले तर अनेक व्यापाऱ्यांचे धंदे पूर्णपणे बंद आहेत. एकीकडे दुकानात विक्रीअभावी पडून राहिलेला माल तर दुसरीकडे गाळ्यांचे सुरु असलेले भाडे अशा दुहेरी संकटात हे गाळेधारक व्यापारी पुरते अडकले आहेत. या कालावधित व्यवसाय न झाल्याने तीन महिन्याचे गाळे भाडे माफ करण्यात यावे अशी मागणी प्रशांत पुरुषोत्तम गांगुर्डे या गाळेधारकांनी मुख्याधिकारी व लोकनियुक्त नागराध्यक्ष निलेश चौधरी  यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

छत्रपती शिवाजी महाराज शॉपिंग कॉम्प्लेक्समधील गाळेधारक प्रशांत गांगुर्डे यांनी दिलेल्या निवेदनाचा आशय असा की, कोरोना विषाणूच्या प्रादुर्भाव कमी व्हावा यासाठी भारत सरकारने आजतागायत ४ टप्प्यात लॉकडाउन वाढवले. केंद्र आणि राज्य सरकारचे आदेश पाळत धरणगाव शहरातील सर्व लहान, मोठे व्यापारी बांधवांनी देखील आपआपले दुकाने बंद ठेवत, यात सहभाग नोंदवला. विशेष म्हणजे धरणगाव शहरात जनता संचारबंदी देखील यशस्वी झाली. व्यापारी बंधुंनी दरवेळेस प्रत्येक आवाहनाला १०० टक्के प्रतिसाद दिला आहे. यामुळे मी व माझे व्यापारी बांधव आर्थिक विवंचनेत आले असून अजूनही लवकर ते स्थिरस्थावर होण्याची चिन्हे नाहीत. तेव्हा धरणगाव नगरपरिषद संचलित सर्व जुने आणि नवीन गाळ्याचे कमीत कमी ३ महिन्याचे भाडे माफ करावेत आणि आम्हाला जगण्यासाठी नवी उमेद द्यावी, अशी मी प्रशांत पुरुषोत्तम गांगुर्डे आपल्याकडे कळकळीची विनंती करत आहे. सेलू नगरपरिषद, जिल्हा परभणी, येथील नगराध्यक्ष आणि मुख्याधिकारी यांनी तेथील ७०० व्यापारी बंधूंचे ४ महिन्याचे गाळे भाडे माफ केले आहे. तेव्हा धरणगाव नगरपरिषदेने देखील असाच निर्णय लवकर जनहितार्थ घ्यावा ही विनंती.

Protected Content