मुक्ताईनगर येथे चांगदेव मंदीरात विविध कार्यक्रम उत्साहात

WhatsApp Image 2019 03 04 at 2.25.35 PM

मुक्ताईनगर (प्रतिनिधी)। आदिशक्ती संत मुक्ताबाईने विजया एकादशीच्या शुभ मुहूर्तावर योगी चांगदेवांना अनुग्रह दिला. या अलौकिक गुरु- शिष्य भेटीचा दिवस आणि महाशिवरात्री असा दुर्मिळ योग जुळून आला आहे. त्यामुळे चांगदेव महाराज समाधी सोहळ्यानिमित्त आदिशक्ती मुक्ताबाई आपल्या भक्तांच्या मेळ्यात दिंड्या पालख्यांसोबत, योगी चांगदेवांच्या भेटीला तापी पूर्णा संगमावर आल्यात. त्यामुळे गुरु-शिष्य भेट सोहळा सोमवारी चांगलाच रंगला.

तत्पूर्वी रविवारी द्वादशीनिमित्त संत मुक्ताई समाधीस्थळी पहाटे पुरुषोत्तम वंजारी यांनी सपत्नीक महापूजा केली. नंतर भाविकांना द्वादशी महाप्रसाद दिला. संत मुक्ताबाई मंदिरात कोथळी येथे सद्गगुरू जगन्नाथ महाराज अंजाळेकर दिंडी सेवक धनराज महाराज अंजाळेकर यांचे कीर्तन झाले. तसेच प्रत्येक दिंडी फडावर कीर्तन भजन भारुडाचे कार्यक्रम होत आहेत. तसेच वारकऱ्यांनी यात्रेत खरेदीचा मनसोक्त आनंद लुटला. सोमवारी पहाटे ५ वाजता चांगदेव मंदिरात संस्थानचे अध्यक्ष अॅड.रवींद्र पाटील यांच्याहस्ते महापूजा करण्यात आली. सकाळी ८ वाजता मुक्ताईनगर येथून संत मुक्ताई पालखी सोहळा वारकऱ्यांचा मेळ्यासह चांगदेव संगमावर पोहोचली तर दुपारी १२ वाजता गुरु मुक्ताई व योगीराज शिष्य चांगदेव यांचा भेट सोहळा उत्साहात पार पडला.

खासदार रक्षाताई खडसे यांच्याहस्ते फराळ वाटप
महाशिवरात्री निमित्त आदिशक्ती मुक्ताई च्या आणि चांगदेवाच्या दर्शनाला येणाऱ्या यात्रेकरू, भाविकांना मुक्ताईनगर येथे जिप सदस्य निलेश पाटील यांच्या वतीने फराळाचे वाटप करताना खासदार रक्षाताई खडसे यांच्यासह आदी मान्यवरांनी फराळ वाटप केला.

Add Comment

Protected Content