भाजपात आले तरी कुणालाच अभय नाही – चंद्रकांत पाटील

 

c patil on ajit pawar

 

 

सोलापूर (वृत्तसंस्था) लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या नेत्यांचे भाजपाकडे मोठ्या प्रमाणावर इनकमिंग चालू आहे. भाजपमध्ये प्रवेश करणे म्हणजे त्यांच्या गैरकृत्यांना अभय दिले जाणार नाही. अजित पवार यांच्यासह सर्व घोटाळेबाजांची चौकशी सुरू आहे. योग्यवेळी त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याला भाजप कचरणार नाही, असा इशारा राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिला. तसचं माढाचे राष्ट्रवादीचे उमेदवार संजय शिंदे यांच्या तीन प्रकरणांची चौकशी सुरू असल्याचा गौप्यस्फोटही पाटील यांनी केला आहे.

भाजप-शिवसेना महायुतीचे माढाचे उमेदवार रणजितसिंह निंबाळकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी चंद्रकांत पाटील सोलापुरात आले होते. यावेळी त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. भाजपच्या मित्र पक्षातील खळखळ संपली असून भाजप-शिवसेना-रिपाईसह इतर घटक पक्षांची युती अभेद्य आहे. महायुतीच्या माध्यमातून पश्चिम महाराष्ट्रातील नगर वगळता ११ पैकी १० जागा महायुती जिंकेल, असा दावासुद्धा यावेळी पाटील यांनी केला. राष्ट्रवादीमधील नेत्यांना भाजपमध्ये घेऊन शुद्धीकरण सुरू आहे का ? असा प्रश्न पाटील यांना करण्यात आला, तेव्हा ते म्हणाले की, आपला देश घटनेवर चालणारा आहे आणि भाजपचा देशाच्या संविधानावर विश्वास आहे. कायद्यांतर्गत ज्यांच्यावर कारवाई करायची आहे, त्यांच्यावर सरकारने कारवाई केली आहे. भुजबळ दोन वर्षे आत राहिले, अजित पवारांची केस तीन वर्षे हायकोर्टात सुरू आहे. न्यायालयाला आवश्यक असणारी सर्व कागदपत्रे सरकारने सादर केली आहेत. कोणत्याही क्षणी न्यायालयाचा निर्णय येऊ शकतो त्यावेळी कोणालाही वाचवण्यात येणार नाही, असं चंद्रकांत पाटील यांनी ठामपणे सांगितले.

Add Comment

Protected Content