प्रधानमंत्री पीक विमा योजनेत जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभागी होण्याचे आवाहन

pm

 

जळगाव (प्रतिनिधी) खरीप हंगाम 2019 करीता अधिसुचित क्षेत्रात अधिसुचित पिकांसाठी प्रधानमंत्री पीक विमा योजना राबविण्यात येत आहे. या योजनेत सहभागी होण्याची मुदत 24 जुलै, 2019 पर्यंत आहे. कापूस पिकासाठी अठराशे रुपयात प्रति हेक्टरी 36 हजार रुपयांचे विमा संरक्षण मिळणार असल्याने जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेत सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी संभाजी ठाकूर यांनी केले आहे.

प्रधानमंत्री पीक विमा योजना जिल्ह्यातील कर्जदार शेतक-यांना बंधनकारक असून बिगर कर्जदार शेतक-यांना ऐच्छिक आहे. एकुण विमा संरक्षित रक्कमेच्या केवळ 2 ते 5 टक्के इतकाच विमा हप्ता दर शेतकऱ्यांना भरावा लागणार आहे. खातेदार शेतकरी तसेच कुळाने अगर भाडेपट्टीने शेती करणारे शेतकरी या योजनेत भाग घेण्यास पात्र आहेत. यासाठी आधार क्रमांकाशी जोडले गेलेले बॅक खाते आवश्यक आहे. शेतकऱ्यांना पीक विम्यासाठी बॅकांबरोबरच आपले सेवा केंद्रामध्ये सुध्दा अर्ज सादर करता येणार आहे.  पेरणीपासून काढणीपर्यंतच्या कालावधीत पिकांच्या उत्पादनात घट- अधिसूचित स्थानिक नैसर्गिक कारणामुळे पिकांचे होणारे काढणीपश्चात नुकसान, पिक पेरणीपासून ते काढणीपर्यंतच्या कालावधीत नैसर्गिक आपत्ती, गारपीट, वादळ, चक्रीवादळ इत्यादी बाबींमुळे उत्पन्नात येणारी घट या बाबी विमा संरक्षणात येतील.

यासाठी आवश्यक कागदपत्रे- विहित नमुन्यातील अर्ज, 7/12 उतारा, बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी आपला फोटो असलेल्या बॅक खाते पुस्तकाची छायाकिंत प्रत, आधार कार्ड सोबत फोटो ओळखपत्र सादर करणे. विमा प्रस्ताव सादर करण्याचा अंतिम दिनांक 24 जुलै, 2019 असा आहे. अधिक माहितीसाठी आपले बॅक खाते ज्या बॅकेत आहे त्या राष्ट्रीयीकृत अथवा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅकेच्या नजीकच्या शाखेशी अथवा तालुका कृषि अधिकारी यांचे कार्यालय येथे संपर्क साधावा.

जळगाव जिल्ह्याकरीता अंमलबजावणी करणारी विमा कंपनी ही अग्रीकल्चर इंन्शुरन्स कंपनी ऑफ इंडिया लि.पुणे ही असून या कंपनीचे मुख्य कार्यालय अग्रीकल्चर इंन्शुरन्स कंपनी ऑफ इंडिया लि.पुणे, मुंबई क्षेत्रिय कार्यालय, स्टॉक एक्सचेंज टॉवर्स 20 वी मंजील, पुर्व खंड, दलाल स्ट्रीट, फोर्ट, मुंबई-23 येथे आहे. कंपनीचा दुरध्वनी क्रमांक 022-61710901 असा असून टोल फ्री क्रमांक 18001030061 हा आहे. अधिक माहितीसाठी येथे संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी संभाजी ठाकूर यांनी केले आहे.

पीकनिहाय प्रति हेक्टरी विमा संरक्षित रक्कम व शेतकऱ्यांनी भरावयाचा विमा हप्ता पुढीलप्रमाणे

खरीप ज्वारी- विमा संरक्षित रक्कम रुपये 24 हजार (480 रुपये), बाजरी- 20 हजार (400 रुपये), सोयाबीन- 36 हजार (720 रुपये), भुईमूग- 31 हजार 500 (630 रुपये), तीळ- 22 हजार (440 रुपये), मुग- 18 हजार 900 (378 रुपये), उडीद- 18 हजार 900 (378 रुपये), तूर- 25 हजार (500 रुपये), कापूस- 36 हजार (1800 रुपये), मका- 26 हजार 200 (524 रुपये) याप्रमाणे विमा हप्ता शेतकऱ्यांना भरावा लागणार आहे. नैसर्गिक कारणामुळे पिकांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होण्याचे आवाहन श्री. ठाकूर यांनी केले आहे.

Protected Content