विद्यापीठात फास्ट ट्रॅक संगणकीय सुविधेचे उद्घाटन

जळगाव -लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात आता त्वरीत ट्रान्सस्क्रीप्ट उपलब्ध करून दिली जाणार असून या फास्ट ट्रॅक संगणकीय सुविधेचे उद्घाटन कुलगुरू प्रा.व्ही.एल. माहेश्वरी यांच्या हस्ते मंगळवार ४ जुलै रोजी करण्यात आले.

 

कंपन्यामध्ये नोकरीसाठी तसेच परदेशात शिक्षणासाठी ट्रान्सस्क्रीप्टची गरज पडत असते. या ट्रान्सस्क्रीप्टमध्ये विद्यार्थ्यांच्या सर्व सत्रांचे गुण उपलब्ध होत असतात. यापुर्वी परीक्षा विभागातील कर्मचाऱ्यांना ट्रान्सस्क्रीप्टसाठी संबंधित विद्यार्थ्यांच्या गुणपत्रकावरून डाटा फीड करावा लागत असे आणि त्यानंतर लेजरवरून फेर तपासणी करावी लागत असे. ट्रान्सस्क्रीप्टमध्ये व्यावसायिक व अव्यावसायिक अभ्यासक्रमांमुळे एकूणच फार्मेटमध्ये बऱ्याच सुधारणा कराव्या लागत असे. काही विद्यार्थी केवळ प्रथम अथवा द्वितीय वर्षाचे ट्रान्सस्क्रीप्ट मागत असल्याने अशावेळी अधिक काळजीपूर्वक लक्ष घालावे लागत असे. या प्रणालीत मनुष्यबळाची आवश्यकता अधिक भासत असे.

 

आता फास्ट ट्रॅक सुविधा विद्यापीठाने उपलब्ध करून दिली असून सन २००९ ते २०२३ पासूनच्या सर्व विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिका संगणीकृत करून घेतल्या असल्यामुळे संगणकात विद्यार्थ्याचा कायम नोंदणीकृत क्रमांक (PRN) टाकल्यानंतर सत्र निहाय गुण उपलब्ध होतील व संबंधित अभ्यासक्रमांची ट्रान्सस्क्रीप्ट स्क्रीनवर दिसेल आणि तातडीने ट्रान्सस्क्रीप्टची प्रिंट देता येईल. या प्रणालीमुळे विद्यार्थ्यांना केवळ एक ते दोन दिवसात ट्रान्सस्क्रीप्ट उपलब्ध करून देणे शक्य होणार आहे. यात वेळेची बचत व कमी मनुष्यबळात काम करणे सुलभ होणार आहे.  यासाठी EDPS हे सॉफ्टवेअर विकसित करण्यात आले आहे. तसेच एम.के.सी.एल. सहकार्याने ई.आर.पी.एस. सॉफ्टवेअर विकसित करण्यात आले आहे.

 

कुलगुरू प्रा. माहेश्वरी व व्यवस्थापन परिषदेचे सदस्य अमोल पाटील, नितीन झाल्टे यांच्या हस्ते या प्रणालीचे उद्घाटन करण्यात आले यावेळी परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक प्रा. दीपक दलाल व उपकुलसचिव डॉ. मुनाफ शेख तसेच संगणक केंद्र प्रभारी प्रमुख निळे यांनी तांत्रिक माहिती दिली. यावेळी प्र-कुलगुरू प्रा.एस.टी. इंगळे, अधिष्ठाता डॉ. साहेबराव भुकन, प्रा. शिवाजी पाटील, कुलसचिव डॉ. विनोद पाटील, अधिसभा सदस्य दीपक पाटील व अमोल मराठे, वित्त व लेखाधिकारी सीए रवींद्र पाटील, उपवित्त लेखाधिकारी एस.आर. गोहिल, उपकुलसचिव के.सी. पाटील, सहा. कुलसचिव सुनील हतागडे, कक्षाधिकारी जगदीश सुरळकर, अनिल पाटील, सिताराम बच्छाव, भैय्या पाटील तसेच परीक्षा विभागातील कर्मचारी उपस्थित होते.

Protected Content