श्री सिद्धेश्वर महादेव मंदिरात काल्याचे कीर्तनाने प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा समारोप

जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | येथील श्रीकृष्ण कॉलनीतील श्री सिद्धेश्वर महादेव मंदिरातर्फे जीर्णोद्धार व प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा शनिवारी दि. ९ मार्च रोजी काल्याचे कीर्तन होऊन व महाप्रसादाने समारोप झाला. महाशिवरात्रीनिंमित विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.

सुमारे ४० वर्षे जुने असलेले श्रीकृष्ण कॉलनीतील श्री सिद्धेश्वर महादेव मंदिर येथे दि. २९ फेब्रुवारी ते ९ मार्च दरम्यान जीर्णोद्धार व प्राणप्रतिष्ठा सोहळा आयोजित करण्यात आला होता. यामध्ये शुक्रवारी दि. ८ मार्च रोजी महाशिवरात्रीनिमित्त भाविकांनी महादेवाचे दर्शन घेतले. तसेच दिवसा सामूहिक शिवमहिमा पठण करण्यात आले. रात्री डॉ. नरेंद्र पाटील यांनी भक्तिगीतांवर बासरीवादन केले. त्यांना तबल्यावर हेमंत उपासनी यांनी साथ दिली. यावेळी वातावरण शिवमय झाले होते. रात्री मंदिरात १० ते १ वाजेदरम्यान महारुद्राभिषेक करण्यात आला. प्रसंगी भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दिली होती.

शनिवारी दि. ९ मार्च रोजी सकाळी ९ वाजता पिंप्राळ्यातील हभप सारंग महाराज यांनी काल्याचे कीर्तन केले. महादेवाची भक्ती केल्याने जीवनात अनेक समस्यांवर मार्ग सापडतात असे सांगून महादेवांच्या सिध्दीने आयुष्य सुखकर होते असेही ते म्हणाले. यावेळी आ. राजूमामा भोळे, सामाजिक कार्यकर्ते मनोज काळे, ,माजी उपमहापौर अश्विन सोनवणे, मनोज वाणी आदींनी उपस्थिती देऊन भगवान महादेवाचे दर्शन घेतले.

यावेळी महाप्रसादाचा लाभ भाविकांना देण्यात आला. सुमारे ४०० पेक्षा अधिक भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. दहादिवसीय सोहळ्यासाठी प्रा. सचिन पाटील, मिलिंद काळे, विमल धांडे, उन्नती कुलकर्णी आदींनी सहकार्य केले.

Protected Content