रेडक्रॉस येथे जागतिक दिव्यांग दिवस साजरा

जळगाव, प्रतिनिधी | जागतिक दिव्यांग दिनाच्या निमीत्ताने इंडियन रेडक्रॉस सोसायटी व जिल्हा परिषदेच्या जिल्हा समाजकल्याण विभाग तसेच जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राच्या विद्यमाने दिव्यांग व्यक्ती, फिजोयोथेरेपी तज्ञ यांचा रेडक्रॉस भवन येथे सत्कार करण्यात आला.

३ डिसेंबर जागतिक दिव्यांग दिननिमित्ताने उल्लेखनीय व विशेष कार्य करणा-या जिल्ह्यातील दिव्यांग व्यक्तींना मान्यवरांच्या हस्ते सन्मानीत करण्यात आले. जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राच्या फिजीयोथेरेपी केंद्रात फिजीयोथेरेपी देणाऱ्या २० फिजीयोथेरेपी तज्ञांचा सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. तसेच दिव्यांग २० बालकांना फिजीयोथेरेपीचे साहित्य वाटप करण्यात आले. जिल्हा परिषद यांचेतर्फ़े मतीमंद व बहुविकलांग मुलांना कायदेशीर पालकत्वाचे २१ लाभार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात आले. तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय यांचे मार्फत देण्यात आलेले स्वावलंबन कार्डचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमास मुख्य अतिथी म्हणून जिल्हाधिकारी अभिजीत राऊत तसेच जिल्हा परीषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पकंज आशिया, उपजिल्हा निवडणूक अधिकारी तुकाराम हुलावळे, जिल्हा परिषदेचे अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बाळासाहेब मोहन, जिल्हा समाजकल्याण अधिकारी विजय रायसिंग, इंडियन रेडक्रॉस सोसायटीचे उपाध्यक्ष गनी मेमन, मानद सचिव विनोद बियाणी, डॉ. अपर्णा मकासरे, डॉ. अनिल सिरसाळे, समाजकल्याण विभागाचे भरत चौधरी, जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राचे नोडल अधिकारी जी.टी. महाजन, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी योगेश मुक्कावार, डॉ. उल्हास पाटील फिजीयोथेरेपी कॉलेजचे प्राचार्य डॉ. जयवंत नागुलकर, स्वयंदीप दिव्यांग महिला कापड उद्योगांच्या संचालिका मिनाक्षी निकम, चाळीसगाव येथील समाजसेवक वर्धमान धाडीवाल, मुक्ती फाउंडेशनचे मुकुंद गोसावी हे उपस्थित होते.
दिव्यांगाच्या रोजगाराचा प्रश्न सोडविण्यासाठी त्यांना योग्य ते व्यवसायीक प्रशिक्षण देऊन त्यांना स्वयंरोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी विविध विभाग, सामाजिक संस्था यांच्या सहभागाने प्रयत्न केले जातील असे प्रतिपादन जिल्हाधिकारी यांनी केले. गनी मेमन यांनी दिव्यांगत्व हा शाप न मानता त्यास आव्हान म्हणून बघितल्यास जिवन आनंदात जगणे सोपे जाईल व त्यांचे जगणे सुलभ होण्याकरीता भविष्यात जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र व इंडियन रेडक्रॉस सोसायटी माध्यमातून दिव्यांगांना व्यापक व सुयोग्य प्रमाणात मदत केली जाईल असे आश्वासन दिले. दिव्यांग मतदानाचे प्रमाण वाढविण्यासाठी निवडणूक आयोगाकडून विशेष प्रयत्न करण्यात येत आहे त्याबाबतची माहिती तुकाराम हुलावळे यांनी दिली. मिनाक्षी निकम यांनी जिल्ह्यातील दिव्यांगांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्याबाबत विशेष लक्ष देऊन रोजगार उपलब्ध करुन देण्याचा मानस व्यक्त केले. प्रास्ताविक नोडल ऑफीसर जी. टी. महाजन यांनी केले तर आभार जिल्हा समाजकल्याण अधिकारी विनोद रायसिंग यांनी मानले. सुत्रसंचालन रेडक्रॉसच्या जनसंपर्क अधिकारी उज्वला वर्मा यांनी केले तर कार्यक्रमास दिव्यांग पुनर्वसन केंद्राचे सुवर्णा चव्हाण, शोएब शेख, रेडक्रॉसचे सर्व कर्मचारी तसेच विशेष दिव्यांग शाळांचे कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

 

Protected Content