मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | भारतीय पोस्ट खात्याने ‘रजिस्टर प्रिंटेड बुक्स’ ही पार्सल सेवा अचानक बंद केल्यामुळे देशभरातील लाखो पुस्तक विक्रेते अडचणीत सापडले आहेत. पोस्टाच्या या निर्णयामुळे पुस्तकांची ऑनलाईन खरेदी महाग होणार आहे. पोस्टाने ही सेवा पूर्ववत करावी अशी मागणी देशभरातील पुस्तक विक्रेत्यांकडून करण्यात येत आहे. विशेष म्हणजे आधी कोणतीही कल्पना न देताच पोस्ट खात्याने ‘रजिस्टर प्रिंटेड बुक्स’ ही सेवा बंद केल्याने पुस्तक विक्रेत्यांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे.
प्राप्त माहितीनुसार, भारतीय पोस्ट खात्याची ‘रजिस्टर प्रिंटेड बुक्स’ ही सेवा तुलनेने स्वस्त होती. या सेवेचा वापर करून देशभरातील अनेक पुस्तक विक्रेते वाचकांना पुस्तके पाठवत असत. ‘रजिस्टर प्रिंटेड बुक्स’ या सेवेचे आता ‘बुक पोस्ट’ असे नामांतर करण्यात आले असून त्याचे दर वाढवण्यात आले आहे. पूर्वी ‘रजिस्टर प्रिंटेड बुक्स’ सेवेद्वारे ३० रुपयांमध्ये २००० ग्रॅमपर्यंतचे छापील पुस्तक पाठवण्याची सोय होती. आता ‘बुक पोस्ट’ या नव्या सेवेद्वारे ३० रुपयांत फक्त ५०० ग्रॅम वजनाचे पुस्तक पाठवता येणार आहे. त्यामुळे एरव्ही जे पुस्तकाचे एक पार्सल ३० रुपयात पाठवता यायचे त्यासाठी ६२ रुपये लागणार असल्याची माहिती पुस्तक विक्रेते अमोल पाटकर यांनी ‘हिंदुस्तान टाइम्स- मराठी’ला दिली.
पोस्ट खात्यातर्फे त्यांच्या काही सेवांची नावे बदलण्यात आली आहे. तर काही सेवा खंडित करण्यात आल्या आहेत. ‘VPP (vas) सर्विस’ या सेवेचे नाव बदलून COD -Retail असे करण्यात आले आहे. इलेक्ट्रॉनिक मनी ऑर्डरद्वारे पूर्वी ५००० रुपयापर्यंतची रक्कम पाठवता येत असे. आता त्याची कमाल मर्यादा १० हजार रुपये करण्यात आली आहे. इंडियन पोस्टल ऑर्डरचे (IPO) डिनॉमिनेशन्स पूर्वी ०.५० पैसे, रु १, रु २, रु ५, रु ७, रु १०, रु २०, रु ५०, रु १०० किमतीत उपलब्ध होते. आता याची संख्या कमी करण्यात आली असून ते फक्त रु. १०, रु. २०, रु. ५० आणि रु. १०० च्या मूल्यांमध्येच मिळणार आहे.