गुलाबराव देवकरांच्या विरोधातील याचिका फेटाळली

जळगाव प्रतिनिधी | माजी मंत्री तथा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते गुलाबराव देवकर यांच्या विरोधातील सुप्रीम कोर्टातील याचिका फेटाळण्यात आल्याने त्यांना दिलासा मिळाला आहे. यामुळे त्यांच्या जिल्हा बँक सदस्यत्वावरील संभाव्य गंडांतर दूर झाल्याचे दिसून येत आहे.

जळगाव जिल्हा बँकेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या वतीने सहकार पॅनलमधून माजी मंत्री तथा राष्ट्रवादीचे नेते गुलाबराव देवकर यांनी अर्ज दाखल केला होता. मात्र गुलाबराव देवकर यांना जळगाव येथील बहुचर्चीत घरकूल घोटाळ्यात न्यायालयाने पाच वर्षांची शिक्षा सुनावली आहे. ३१ ऑगस्ट २०१९ रोजी त्यांना पाच वर्षे शिक्षा आणि पाच लाखांचा दंड ठोठावण्यात आला होता. विद्यमान नियमानुसार दोन वर्षांपेक्षा जास्त शिक्षा झाल्यास कोणतीही निवडणूक लढविता येत नाही. मध्यंतरी देवकरांच्या शिक्षेला न्यायालयाने स्थगिती दिली होती. मात्र ते जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी उभे राहिले असतांना त्यांच्या विरोधात उभे असणारे जिल्हा परिषदेचे आरोग्य आणि शिक्षण सभापती रवींद्र सूर्यभान पाटील यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. त्यांनी पवन ठाकूर यांनी दाखल केलेल्या याचिकेत त्रयस्थ अर्जदार म्हणून सुप्रीम कोर्टात दाद मागितली होती.

यावरील याचिकेवर दोनदा सुनावणी झाली. याचा निकाल आज लागला. यात गुलाबराव देवकर यांच्या वतीने मुकुल रोहतगी आणि अनिकेत निकम यांनी प्रभावी युक्तीवाद केला. यामुळे सुप्रीम कोर्टाने त्यांच्या विरोधातील याचिका फेटाळून लावली आहे. परिणामी देवकर यांचे जिल्हा बँकेचे संचालकपद शाबूत राहिले आहे. यासोबत त्यांचा भविष्यात निवडणूक लढविण्याचा मार्ग देखील मोकळा झाला आहे.

Protected Content