३७० वर प्रश्न विचारणाऱ्या विरोधी पक्षांना लाज नाही – मोदी

अकोला, वृत्तसंस्था | शिवाजी महाराजांच्या भुमीवरुन राजकीय स्वार्थासाठी आजकल महाराष्ट्राच्या निवडणुकांमध्ये कलम ३७० चे महाराष्ट्राचे काय घेणं-देणं ?, असे प्रश्न विचारले जात आहेत. “महाराष्ट्रातील विरोधी पक्षांना लाज नाही, त्यामुळे ते खुलेपणाने विचारत आहेत की, काश्मीरचा महाराष्ट्राशी संबंध काय?. मात्र, त्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवावी की, महाराष्ट्राचा असा एकही जिल्हा नसेल जिथल्या जवानांनी काश्मीरमधील शांततेसाठी बलिदान दिलेले नाही. मग, याच शांततेसाठी हटवलेल्या कलम ३७०चा महाराष्ट्राशी संबंध कसा नाही ?, असा सवाल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीला विचारला आहे.

 

राज्यात कलम ३७०वरुन विरोधकांनी भाजपाला टार्गेट केल्यानंतर मोदी या मुद्दावरुन आक्रमक झाले आहेत. अकोला येथे महायुतीच्या प्रचारादरम्यान ते बोलत होते. मोदी पुढे म्हणाले, “असा आवाज उठवणाऱ्यांना मी सांगू इच्छितो त्यांनी कान उघडून ऐकावे. जम्मू-काश्मीरचे लोकही भारताचीच मुले आहेत. महाराष्ट्राचा असा एकही जिल्हा नसेल जिथून कोणत्या जावानाने काश्मीरच्या शांततेसाठी बलिदान दिले नसेल. महाराष्ट्रातील जवानांनी काश्मीरमध्ये शत्रूंशी निकराचा लढा दिला. कारण त्यांना माहिती होते आपण शिवाजी महाराज्यांच्या राज्यातून आलो आहोत. या विश्वासानेच त्यांनी काश्मीरमध्ये जाऊन बलिदान दिले. आम्हाला राज्यातील या जवानांच्या बलिदानाचा अभिमान आहे. मात्र, आज केवळ आपल्या कुटुंबाचे पोषण करणारे राज्यातील लोक विचारतात की, राज्याचा जम्मू-काश्मीरशी संबंध काय ? असा प्रश्न विचारणाऱ्यांना आपल्या विधानावर लाज वाटायला हवी. त्यांनी बुडून मरावे.”

“कलम ३७० रद्द व्हावे ही आपली इच्छा होती, ते आम्ही करुन दाखवले. तुमचे आमच्यावर आशिर्वाद कायम होते म्हणून हे शक्य झाले. आपले आशिर्वाद असेच राहिले तर मोदी असेच नवनवे कारनामे करुन दाखवेन. विरोधीपक्षांनी सांभाळून ठेवलेले ३७० कलम आता जनतेच्या पायाशी आले आहे. त्यांना एकमेकांसोबत लढणारा भारत पाहिजे आहे, याच त्यांच्या चाली होत्या, आज या चाली भुईसपाट होत आहेत,” असेही मोदी यावेळी म्हणाले.

मोदी पुढे म्हणाले, “वोट बँकेच्या राजकारणाने राज्याचे मोठे नुकसान केले आहे. राज्यात एक अशी वेळ होती जेव्हा प्रत्येक दिवसागणिक महाराष्ट्रात बॉम्ब स्फोट होत होते. हे बॉम्बस्फोट करणाऱ्यांची नावे समोर आली, ते देश सोडून शत्रू राष्ट्रांमध्ये पळून गेले. यामागील आता नवंनवी नावे समोर येत आहेत. यापूर्वीही ते घाबरलेले होते, त्यामुळेच गेल्या काही दिवसांपासून त्यांनी तपास यंत्रणांना आणि भारत सरकारला बदनाम करणे सुरु केले होते.” काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या भ्रष्टवादी युतीने राज्याला १० दशके मागे ढकलून दिल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.

Protected Content