राजकारणही नको अन जीवनही नको – धनंजय मुंडे

Dhananjay Munde Emotional

बीड प्रतिनिधी । राष्ट्रवादीचे नेते आणि विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी आज (दि.20) बीडमध्ये पत्रकार परिषदेत महिला आणि बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्याबाबतचे सर्व आरोप फेटाळले. यावेळी बोलताना धनंजय मुंडे भावूक झाले. त्यांना बोलताना अश्रूही अनावर झाल्याचे पाहायला मिळाले. ते म्हणाले, ‘ज्या बहिणीसाठी 2009 मध्ये हा परळीचा मतदारसंघ सोडला, त्यांच्याकडूनच जर अशी बदनामी निवडणूक जिंकण्यासाठी हे होत असेल, तर असे राजकारणही नको आणि जीवनही नको’. असे म्हणत त्यांनी आपला उद्वेग व्यक्त केला आहे.

धनजंय मुंडे म्हणाले, ”मी 17 ऑक्टोबरला सभेत जे बोललो त्यात एडीट करुन काही लोक आम्हा बहिण भावाच्या नात्यात विष कालवत आहेत. मागील 20 वर्षांपासून मी राजकारणात आहे, मात्र कधीही असं बोललो नाही. या घटनेने मन पिळवटून निघालं. मी माझ्या सख्या बहिणींकडून आधी राखी बांधली नाही, पण पंकजा आणि प्रितमकडून बांधली. याआधीही दोन भावांमध्ये विष कालवण्याचा प्रयत्न झाला. त्याचा परिणाम मी आजही भोगतो आहे. आमचं रक्ताचं नातं आहे. आम्हा बहिण-भावाच्या नात्यात कोण विष कालवण्याचा प्रयत्न करतो आहे याच्या खोलात जाणार. मी अनेक निवडणुका जिंकलो आणि हरलो. मात्र, कधीही कुणाविषयी असं व्यक्तिगत बोललो नाही”.

ज्याला विष कालवायचं होतं त्यांनी विष कालवून माझी बदनामी केली. अशा काही गोष्टी निवडणुकीच्या शेवटच्या काळात होतील, याचा अंदाज होता. मात्र, इतक्या खालच्या पातळीवर होईल, असं वाटलं नाही. निवडणूक विचाराने लढवावी आणि जिंकावी. मात्र, असं घडल्यानं, या नात्यावर डाग लागल्याने हे जग सोडून जावं, असं वाटत होतं. हा अभद्र आरोप निवडणूक जिंकण्यासाठी होत असेल तर असं राजकारणही नको आणि जीवनही नको, असं म्हणत धनंजय मुंडेंनी आपला उद्वेग व्यक्त केला.

Protected Content