वृध्द महिलेचे बंद घर फोडून मुद्देमाल लांबविला

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील शनीपेठ परिसरातील वृध्द महिलेचे बंद घर फोडून गॅस सिलेंडर, शेगडी आणि स्पीकर असा एकुण २ हजार ७५० रूपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना शुक्रवारी १ डिसेंबर रोजी दुपारी अडीच वाजता उघडकीला आले आहे. याप्रकरणी सोमवारी ४ डिसेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता शनीपेठ पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक असे की, लिलाबाई रामनारायण जोशी वय ७२ रा. शनीमंदीराच्या मागे, शनीपेठ, जळगाव या वृध्द महिला आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. घरगुती मेस चालवून त्या आपला उदरनिर्वाह करतात. शुक्रवार १ डिसेंबर रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास ओंकार योगेश सोनवणे रा. रिधुरवाडा शनिपेठ, जळगाव याने बंद घराचे लोखंडी गेट व भिंतीच्या मधील जागेतून आत प्रवेश करत घरातून रिकामे गॅस सिलेंडर, शेगडी आणि स्पीकर असा एकुण २ हजार ७५० रूपयांचा मुद्देमाल चोरून नेला. हा प्रकार लक्षात आल्यानंतर वृध्द महिलेने शनीपेठ पोलीस ठाण्यात धाव घेवून चोरी झाल्याबाबत तक्रार दिली. त्यानुसार सोमवारी ४ डिसेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता शनीपेठ पोलीस ठाण्यात संशयित आरोपी ओंकार योगेश सोनवणे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोहेकॉ प्रशांत देशमुख हे करीत आहे

Protected Content