सकाळचा शपथविधी ही पवार साहेबांचीच खेळी ! : जयंत पाटलांचा गौप्यस्फोट

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | अजित पवार यांनी फडणविसांसोबत सकाळी घेतलेला शपथविधी ही पवार साहेबांचीच खेळी असू शकते असे वक्तव्य करून राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी खळबळ उडवून दिली आहे.

राज्याच्या राजकारणात अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत २३ नोव्हेंबर २०१९ रोजी भल्या पहाटे घेतलेल्या शपथविधीने खळबळ उडाली होती. अर्थात, हे सरकार अल्पायुषी ठरले. यामुळे हा प्रकार नेमका घडला तरी कसा ? याबाबत अनेकदा चर्वण होत असते. आता याच प्रकाराला उजळणी मिळाली आहे ती राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केलेल्या वक्तव्यामुळे !

एबीपी माझा या वृत्तवाहिनीशी बोलत असताना जयंत पाटील म्हणाले, मला वाटत नाही की अजित पवार काही बोलले असतील. पण त्यावेळी राज्यात राष्ट्रपती राजवट होती. राष्ट्रपती राजवट उठविण्याशिवाय काही पर्याय नव्हता. त्या अनुषंगाने केलेली ही एक खेळी असू शकते. त्यामुळे मला वाटत नाही की त्याला यापेक्षा जास्त काही महत्त्व आहे. त्यावेळी अजित पवार यांनी केलेल्या वक्तव्यांना आज महत्त्व नाही. त्यानंतर अजित पवार यांनी उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली उपमुख्यमंत्री म्हणून काम केले. या काळात त्यांनी स्पष्टपणे कारभार केला. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष फुटला नाही. आता शिवसेनेचे आमदर फुटल्यामुळे सरकार कोसळले. पण राष्ट्रवादी कॉंग्रेसने उद्धव ठाकरेंना शेवटपर्यंत ठामपणे साथ दिली, हे नाकारता येणार नाही असे जयंत पाटील म्हणाले.

जयंत पाटील यांनी केलेल्या या विधानामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडालेली आहे. यावरून आता विविध प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत.

Protected Content