हिवरा आश्रमातील महाप्रसादाला लाखोंची शिस्तबध्द पंगत !

बुलढाणा-अमोल सराफ | राज्याच्या कानाकोपर्‍यातून आलेल्या तब्बल एक लाखापेक्षा अधिक भाविकांनी विवेकानंद जयंती महोत्सवानिमित्त आयोजित महापंगतीचा आज लाभ घेतला.

तब्बल ५४ वर्षांची प्रदीर्घ परंपरा लाभलेल्या हिवरा आश्रमातील विवेकानंद जन्मोत्सव सोहळ्याची शनिवारी दुपारी पाच वाजेच्या दरम्यान तब्बल लाखो भाविकांच्या महापंगतीने सांगता झाली. या महापंगतीने सामूहिक महाप्रसाद सेवनाचा लाभ घेणार्‍या भाविकांच्या गर्दीचा स्वतःचाच विक्रम मोडित काढला. सामूहिक शिस्तीची भक्ती दाखवित ४० एकराच्या परिसरात एकाचवेळी ५३ पंगती बसल्या होत्या. तब्बल १०१ ट्रॅक्टरद्वारे व तीन हजार स्वयंसेवकांनी महाप्रसाद वितरणात सहभाग घेतला होता. विशेष बाब म्हणजे, कोणतीही अस्वच्छता न करता ही महापंगत उठली. महाप्रसाद घेण्यापूर्वी लाखो भाविकांच्या मुखातून निघालेल्या स्वामी विवेकानंद की जय… भारत माता की जय… पू. शुकदास महाराज की जय… या जयघोषाने आसमंत दुमदुमून गेला होता.

सर्व भाविकांचे विवेकानंद शिक्षण संकुलातील विद्यार्थी, विद्यार्थिनींनी कुंकूम-चंदन तिलक लावून, धूपआरती ओवाळून पूजन केले. यावेळी खा.प्रतापराव जाधव,माजी मंत्री तथा आ.राजेंद्र शिंगणे,आ.डॉ.संजय रायमूलकर,माजी आ.राहुल बोंद्रे,यांच्या वतीने त्यांच्या पत्नी वृषालीताई बोंद्रे, माजी जि.प.सदस्य तथा गट नेता आशिष रहाटे,ठाकरे गटाचे संपर्क प्रमुख नरेंद्र खेडेकर,ह.भ.प.प्रकाशबुवा जवंजाळ,माजी जि.प.सदस्य संजय वडतकर,वसंतराव मगर, भाष्करराव काळे, शिवदास रिंढे, ताठे, व्हि.टी.गाभणे, माजी.पं.स.सदस्य शेषराव काळे,जेष्ठ पत्रकार सिध्देश्वर पवार प्रमोद रायमूलकर,दत्ता खरात,दिलीपबापू देशमुख,प्राचार्य कैलास बियाणे,प्राचार्य पागोरे तथा आदि उपस्थित होते.

महाप्रसाद स्थळावरील मनोर्‍यावरुन वेदांताचार्य गजाननदादा शास्त्री यांचे बहारदार सूत्रसंचलन सुरु होते. त्यांनी शंखध्वनीसह केलेल्या स्वामी विवेकानंद व पू. शुकदास महाराज यांच्या जयनाम घोषाने आसमंत अक्षरशः निनादून गेला होता. लाखो भाविकांच्या मुखातून हा जयघोष उमटला होता. महापंगतीच्या सुरुवातीस विद्यार्थी-विद्यार्थिनींनी भाविकांचे पूजन करून त्यांना कुंकूम-चंदन तिलक लावला. त्यानंतरउपस्थित मान्यवरांच्या हस्ते भाविकांना पुरी-भाजीचा प्रसाद वाटप करून महाप्रसाद वितरणास सुरुवात करण्यात आली. शिस्तबद्धपणे या लक्षावधी भाविकांनी भावपूर्ण वातावरणात हा महाप्रसाद सेवन केला. विवेकानंद आश्रमाचे आजी-माजी विश्वस्त, पदाधिकारी यांनी सोहळा यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले. यावेळी पोलीस उपविभागीय अधिकारी नंदकिशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली साखरखेर्डा पोलिस ठाण्याचे ठाणेदार व त्यांच्या सहकार्‍यांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता.

Protected Content