भारतात लवकरच धावणार अत्याधुनिक खासगी रेल्वेगाड्या

private train

नवीदिल्ली, वृत्तसंस्था | भारतीय रेल्वेच्या मार्गांवर आता लवकरच जागतिक दर्जाच्या सुविधा देणाऱ्या खासगी रेल्वेगाड्या धावताना पहायला मिळतील. अशा खासगी रेल्वे गाड्यांना भारतीय रेल्वेच्या नेटवर्कमध्ये व्यवसायास परवानगी देण्याच्या विशेष प्रस्तावावर रेल्वे मंत्रालयाकडून सध्या विचार सुरु आहे. त्यामुळे प्रवाशांना या अत्याधुनिक खासगी रेल्वेगाड्यांमधून प्रवासाचा सुखद अनुभव घेता येणार आहे.

 

राज्यातील मुंबई, पुणे, औरंगाबाद या शहरांना जोडणाऱ्या मार्गांचा या योजनेत समावेश असल्याने येथील प्रवाशांना या खासगी रेल्वे सेवेचा लाभ घेता येणार आहे. यासाठी भारतीय रेल्वे बोर्डाने यापूर्वीच २४ महत्वाच्या मार्गांचा अभ्यास करुन त्याचा सविस्तर अहवाल देण्याच्या सूचना विभागीय रेल्वे बोर्डांना केल्या आहेत. या मार्गांवर अशाप्रकारे खासगी रेल्वे चालवणे किती सोयीचे असेल, यासाठी याची चाचपणी केली जाणार आहे. यासंदर्भातील रेल्वे बोर्डाच्या एका पत्रानुसार यामध्ये देशातील महत्वाच्या शहरांना जोडणाऱ्या त्या २४ व्यस्त रेल्वे मार्गांचा उल्लेख करण्यात आला आहे. यासंदर्भात २७ सप्टेंबर रोजी एक बैठकही होणार आहे.

खासगी रेल्वे ऑपरेटर्स हे जागतिक दर्जाच्या सेवांसह अत्याधुनिक प्रवाशी रेल्वे गाड्या चालवू शकतात, याची रेल्वे बोर्डाला खात्री आहे. दरम्यान, या योजनेसाठी खासगी रेल्वे ऑपरेटर्सचा सहभाग असलेल्या जागतीक बोली प्रक्रियेच्या आधारे निर्णय घेण्यात येईल, असे रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष व्ही.के. यादव यांनी यापूर्वीच सूचित केले आहे. सवलतीच्या कराराच्या आधारे भाडे निश्चित करण्याचे व ते वसूल करण्याचा अधिकार या खासगी ऑपरेटर्सना असतील. यासाठी ते भारतीय रेल्वेला ठराविक स्वरुपाचे भाडे देतील, असेही त्यांनी स्पष्ट केले होते.

अत्याधुनिक खासगी रेल्वेसाठी निवडण्यात आलेले २४ रेल्वेमार्ग :-

लांब पल्ल्याच्या सेवेसाठीचे मार्ग –
दिल्ली-मुंबई, दिल्ली-लखनऊ, दिल्ली-जम्मू/कत्रा, दिल्ली-हावडा, सिकंदराबाद-हैदराबाद, सिकंदराबाद-दिल्ली, दिल्ली-चेन्नई, मुंबई-चेन्नई, हावडा-चेन्नई, हावडा-मुंबई.
इंटरसिटी सेवेसाठीचे मार्ग –
मुंबई-अहमदाबाद, मुंबई-पुणे, मुंबई-औरंगाबाद, मुंबई-मडगाव, दिल्ली-चंदीगड/अमृतसर, दिल्ली-जयपूर/अजमेर, हावडा-पुरी, हावडा-टाटा, हावडा-पाटणा, सिकंदराबाद-विजयवाडा, चेन्नई-बंगळूरू, चेन्नई-कोईम्बतूर, चेन्नई-मदुराई, एर्नाकुलम-त्रिवेंद्रम.
उपनगरीय सेवेसाठीचे मार्ग –
मुंबई, कोलकाता, चेन्नई, सिकंदराबाद

Protected Content