


यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । इंटरनेट, मोबाईल आणि संगणकाच्या आधुनिक युगात अनेक पारंपरिक कला आणि भाषा काळाच्या ओघात लुप्त होत असताना जामनेर तालुक्यातील काही कलाकारांनी शिवकालीन करपल्लवी भाषेची परंपरा आजही जपून ठेवली आहे. जोगलखेडे वाडी येथील हे कलाकार गावोगावी फिरून आपल्या अनोख्या कलेचे सादरीकरण करीत असून, त्यातून मिळणाऱ्या दक्षिणेवर आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत आहेत.
जामनेर तालुक्यातील जोगलखेडे वाडी येथील संजय उत्तम शिंदे, आकाश कैलास शिंदे आणि प्रकाश विश्वनाथ शिंदे हे कलाकार विविध गावांमध्ये तसेच तालुक्यांमध्ये फिरून करपल्लवी भाषेची कला सादर करतात. आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगातही या कलाकारांनी आपल्या पूर्वजांकडून आलेली ही पारंपरिक कला जिवंत ठेवली असून, त्यांच्या सादरीकरणातून जुन्या काळातील संस्कृतीची झलक पाहायला मिळते. शिवकालीन करपल्लवी ही इतर भाषांपेक्षा वेगळी आणि वैशिष्ट्यपूर्ण मानली जाते. या भाषेत हाताच्या आणि बोटांच्या विशिष्ट इशाऱ्यांच्या माध्यमातून व्यक्तीचे नाव किंवा ओळख सांगितली जाते. त्यानंतर वाजंत्रीच्या साथीने संबंधित व्यक्तीचे नाव आदराने घेतले जाते. या अनोख्या कलेचे सादरीकरण पाहण्यासाठी नागरिकांमध्येही उत्सुकता निर्माण होते.
या कलेत कलाकारांना भाषेचे ज्ञान असण्याबरोबरच बोटांच्या इशाऱ्यांचा अचूक वापर, त्यातील संकेत समजून घेणे आणि योग्य पद्धतीने ते सादर करणे आवश्यक असते. त्यामुळे ही केवळ मनोरंजनाची कला नसून अनेक वर्षांची परंपरा, कौशल्य आणि सराव यांचा वारसा असल्याचे कलाकार सांगतात. गावोगावी फिरून कला सादर केल्यानंतर नागरिकांकडून मिळणाऱ्या दक्षिणेतून या कलाकारांचा संसार चालतो. मात्र बदलत्या काळात पारंपरिक कलांना मिळणारा प्रतिसाद आणि त्यातून मिळणारे उत्पन्न कमी होत असल्याने कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे दिवसेंदिवस कठीण होत असल्याची खंत या कलाकारांनी व्यक्त केली.
आपली पारंपरिक कला पुढच्या पिढीपर्यंत पोहोचावी आणि कलाकारांच्या कुटुंबाला आर्थिक आधार मिळावा, यासाठी शासनाने विशेष योजना राबवाव्यात, अशी अपेक्षा संजय शिंदे, आकाश शिंदे आणि प्रकाश शिंदे यांनी व्यक्त केली आहे. पारंपरिक कलाकारांना आर्थिक मदत, सादरीकरणासाठी व्यासपीठ आणि शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळाल्यास ही कला आणखी काही वर्षे जिवंत ठेवता येईल, असे त्यांचे म्हणणे आहे. आजच्या डिजिटल युगात करपल्लवीसारख्या पारंपरिक भाषा आणि कलांचे अस्तित्व टिकवून ठेवणे ही मोठी बाब आहे. जामनेर तालुक्यातील या कलाकारांनी आपल्या कलेच्या माध्यमातून केवळ उदरनिर्वाहाचा मार्ग जपला नाही, तर शिवकालीन परंपरेचा एक अनमोल ठेवाही पुढे नेला आहे.



