


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । शाहूनगर परिसरातील अंगणवाडीच्या सहयोगाने लीनेस क्लब जळगावतर्फे गर्भवती महिला आणि बालकांसाठी आरोग्य तपासणी व मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात स्त्रीरोग तज्ज्ञ आणि बालरोग तज्ज्ञांनी उपस्थित महिलांची व बालकांची आरोग्य तपासणी करून त्यांना आवश्यक मार्गदर्शन केले. यासोबतच ‘सुदृढ बालक’ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. अंगणवाडीच्या पोषण आहार सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर पोषण आहाराची आकर्षक प्रदर्शनीही यावेळी मांडण्यात आली होती.
गर्भवती महिलांच्या आरोग्याची नियमित तपासणी, योग्य आहार आणि आवश्यक वैद्यकीय मार्गदर्शन याबाबत शिबिरात विशेष जनजागृती करण्यात आली. स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. केतकी आवटे यांनी गर्भवती महिलांची तपासणी करून गर्भावस्थेतील आरोग्यविषयक काळजी, नियमित वैद्यकीय तपासणी आणि पोषक आहाराचे महत्त्व समजावून सांगितले.
तसेच बालरोग तज्ज्ञ डॉ. निशिगंधा सोनवणे यांनी बालकांची आरोग्य तपासणी केली. बालकांच्या शारीरिक वाढीबरोबरच त्यांच्या आरोग्याची योग्य निगा कशी राखावी, आहारामध्ये कोणत्या पौष्टिक पदार्थांचा समावेश करावा आणि बालकांच्या आरोग्याशी संबंधित कोणत्या बाबींकडे पालकांनी गांभीर्याने लक्ष द्यावे, याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले.
शिबिरादरम्यान घेण्यात आलेल्या ‘सुदृढ बालक’ स्पर्धेला ही चांगला प्रतिसाद मिळाला. बालकांच्या आरोग्यपूर्ण वाढीला प्रोत्साहन देणे, पालकांमध्ये पोषणाविषयी जागरूकता निर्माण करणे आणि बालकांच्या आरोग्याकडे अधिक गांभीर्याने पाहण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.
अंगणवाडीचा पोषण आहार सप्ताह सुरू असल्याने यावेळी विविध पौष्टिक खाद्यपदार्थांची प्रदर्शनी मांडण्यात आली होती. उपलब्ध स्थानिक व पौष्टिक पदार्थांचा उपयोग करून गर्भवती महिला आणि बालकांसाठी सकस आहार कसा तयार करता येतो, याची माहिती या प्रदर्शनातून देण्यात आली. पोषण आहाराचे महत्त्व समजावून सांगणाऱ्या या उपक्रमाला उपस्थितांचा सकारात्मक प्रतिसाद मिळाला.
लीनेस क्लब जळगावतर्फे शिबिराला उपस्थित महिला व बालकांना फळे, शेंगदाण्याची चिक्की आणि राजगिऱ्याचे लाडू देण्यात आले. पौष्टिक खाद्यपदार्थांच्या माध्यमातून आरोग्य आणि पोषणाचा संदेश देण्याचा प्रयत्न यावेळी करण्यात आला.
लीनेस क्लबच्या अध्यक्ष रेखा वर्मा यांनी आपल्या भाषणातून गर्भावस्थेचे महत्त्व अधोरेखित केले. त्या म्हणाल्या, “गर्भावस्था हा प्रत्येक महिलेच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचा टप्पा असतो. या काळात नियमित आरोग्य तपासणी, योग्य मार्गदर्शन आणि पोषक आहार या सर्व गोष्टी आई आणि बाळाच्या आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. त्यामुळे हे शिबिर केवळ आरोग्य तपासणीपुरते मर्यादित नसून, माता आणि बालकांच्या आरोग्याबाबत जागरूकता निर्माण करणारा उपक्रम आहे.”



